मतदानापूर्वी अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र? थेट प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु

अकोला महानगरपालिका निवडणूक राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापूर्वीच अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अकोल्यात मोठं धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मदत मागितली आहे. वंचितचे उमेदवार नसलेल्या जागांवर शिवसेना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे नेते संजय राठोड वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे.

अकोला महापालिकेत शिंदेसेना 80 पैकी 72 जागांवर लढत आहे

अकोल्यात महायुती फिस्कटली असून भाजप आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. महायुतीमधील जागावाटप फिस्कटल्याने शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढत आहे. तर शिवसेनेने 80 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. अकोला महापालिकेत शिंदेसेना 80 पैकी 72 जागांवर लढत आहे. तर वंचित 54 जागा लढवत आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना शिंदेसेनेनं मोठा डाव टाकला आहे. शिंदेसेनेनं थेट वंचितकडे मदतीची मागणी केली आहे. वंचित लढवत नसलेल्या जागांवर आम्हाला मदत करा, अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे. ‘साम’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर हे शिंदेच्या शिवसेनेला मदत करणार का?

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते संजय राठोड हे प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधवदेखील अकोल्यात पक्षासाठी किल्ला लढवत आहेत. शिंदेसेना-वंचित यांच्यातील पाठिंब्याचा विषय मार्गी लागल्यास निवडणूक निकालावर त्याचे परिणाम दिसू शकतात. अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. इथून ते लोकसभेवर निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये अकोल्यात आंबेडकरांना लक्षणीय मतदान होतं. त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर हे शिंदेच्या शिवसेनेला मदत करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मतदारांचा कौल मतपेटीत कैद होणार आहे. तर 16 जानेवारीला राज्यातील महापालिकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकीकडे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे जरी बोलल्या गेलं तरी राज्यातील अलीकडे जाहल्या राजकीय स्थित्यांतरानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या आहे. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचेही दिसून आलंय.

आणखी वाचा

Comments are closed.