‘या’ सरकारमुळे राज्याची प्रतिमा वेशीला टांगली जात आहे, अंबादास दानवे यांची टीका
महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करतात, त्यांना धमक्या देतात असे आरोप होत आहेत. त्याबाबतच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत. यावरून सध्या गायकवाड यांच्यासोबतच अदिती तटकरे यांच्यावरही टीका होत आहे.
वरील प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी यावरून राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या विभागातच महिला अधिकारी असुरक्षित आहेत. मंत्र्यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्याकडून महिला अधिकाऱ्यांशी लज्जास्पद वर्तन, धमक्या आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचा प्रकार अधिकृत पत्राद्वारे उघडकीस आला आहे. अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले असले, तरी त्यांनी या मुजोर सचिवाला बोलावून साधी विचारणाही केली नसेल, याची विरोधकांना पक्की खात्री आहे. एकीकडे लाखो लाडक्या बहिणींचा हक्क मारायचा आणि दुसरीकडे महिला अधिकाऱ्यांना दमदाटी करायची, हाच या विभागाचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. यामुळे राज्याची प्रतिमा वेशीला टांगली जात आहे. ज्या विभागाने माता-भगिनींचे रक्षण करायचे, तिथेच अधिकारी वर्ग दहशतीखाली जगतोय. या बेजबाबदार आणि भ्रष्ट व्यवस्थेतून तुम्ही ‘लाडक्या बहिणींना’ सुरक्षितता आणि न्याय देणार का? उत्तर द्या!”, असे अंबादास दानवे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.