फिदीफिदी हसण्यावरून राज ठाकरेंनी झापलं, आता अमित साटमांचा पलटवार; म्हणाले, ‘काही लोक घरी बसून..
राज ठाकरेंवर अमित साटम मुंबईत मुसळधार पावसामुळे (Mumbai Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दुर्घटनांच्या मुद्द्यावरून आणि एका व्हायरल व्हिडिओवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजप आमदार अमित साटम (Ameet Satam) यांच्या हसण्यावर आणि असंवेदनशीलतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तीव्र आक्षेप घेतला होता. आता या संपूर्ण वादावर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी पलटवार केला आहे.
अमित साटम यांनी मुंबईतील विविध भागांचा दौरा करून प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागरिकांना तातडीने मदत मिळावी, पाणी साचलेल्या ठिकाणी तत्काळ कारवाई व्हावी तसेच आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर मुंबईतील सर्व भाजप नगरसेवकांना मैदानात उतरून नागरिकांच्या मदतीसाठी काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
Ameet Satam on Raj Thackeray: काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात
अमित साटम म्हणाले की, काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात. गेल्या पंचवीस वर्षांत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी कधी पावसात रस्त्यावर उतरल्याचे बघितले आहे का? आमच्या मुंबईच्या महापौर गल्लोगल्ली फिरत आहेत, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून मुंबईकरांची सेवा करत आहोत, पण काही लोक फक्त पोस्ट लिहत आहेत, असा पलटवार त्यांनी केलाय.
Ameet Satam on Raj Thackeray: फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचे काम
अमित साटम पुढे म्हणाले की, जी घटना होती त्याबाबत मी स्पष्टीकरण दिले आहे, त्या घटनेचा विपर्यास करण्यात येत आहे. फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे, त्यांना ते करू द्या. खरे तर हे दोन्ही पक्ष ज्यांनी युती केली होती, त्यांनी मुंबई महापालिकेतील स्टँडिंग कमिटीतील अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केले होते, ते आम्ही धुडकावून लावले. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आहे, त्यांची चलबिचल झाली आहे. 25 वर्षांत ते जो मलिदा खात होते, तो मलिदा आता त्यांना मिळत नाही म्हणून ते नाराज झाले आहेत. त्या नाराजीतून ते मला टार्गेट करत आहेत. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे देखील त्यांनी म्हटले.
Raj Thackeray on Ameet Satam : राज ठाकरेंची पोस्ट
दरम्यान, राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत अमित साटम यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे? आणि तुम्ही तू पसरू देताय? देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे.
तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली 37 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . (बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिंमत झाली नसती. पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
आणखी वाचा
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.