PUC प्रमाणपत्र नियमांमध्ये सुधारणा
‘बीएस-6’ वाहनांची पीयूसी प्रमाणपत्रे आता तीन वर्षांसाठी वैध
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने नवीन नियमांमध्ये काही बदल केले आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘प्रदूषण नियंत्रण’ (पीयूसी) प्रमाणपत्राचा वैधता कालावधी वाढवण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, सहा वर्षांपेक्षा कमी जुन्या बीएस-6 मानकानुसार असलेल्या खाजगी वाहनांची पीयूसी प्रमाणपत्रे आता तीन वर्षांसाठी वैध असतील. साहजिकच वाहनधारकांना त्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी पीयूसी केंद्रांना वारंवार भेट देण्याची गरज भासणार नाही. तथापि, जुन्या वाहनांना पूर्वीप्रमाणेच त्याच कमी कालावधीत त्यांच्या पीयूसी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करावे लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच पीयूसी प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत सुधारित नियम अधिसूचित केले.
नव्या नियमानुसार, सहा वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या जुन्या बीएस-6 मानकांच्या खाजगी वाहनांना दरवर्षी त्यांच्या पीयूसी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करावे लागेल. 10 वर्षांपेक्षा जुन्या बीएस-6 खाजगी वाहनांसाठी प्रमाणपत्राची वैधता सहा महिने निश्चित करण्यात आली आहे. परिणामी, वाहनाचे वय वाढेल तसतशी पीयूसी नूतनीकरणाची गरज वाढेल. हे बदल केंद्रीय मोटार वाहन नियम, 2026 अंतर्गत करण्यात आले आहेत. हे नियम मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत येतात आणि राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ते अंमलात आले आहेत. नवीन नियमांचा मुख्य उद्देश विविध उत्सर्जन मानके आणि वाहनाच्या वयाच्या आधारावर पीयूसी प्रमाणपत्राची वैधता निश्चित करणे हा आहे. बीएस-6 खाजगी वाहनांना सर्वाधिक दिलासा देण्यात आला आहे.
Comments are closed.