आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय बरं का; मिटकरींचा विखे पाटलांवर पलटवार

मुंबई : महायुतीमधील नेत्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये काही ना काही कारणास्तव शीतयुद्ध पाहायला मिळते. कधी निधी वाटपावरुन, कधी मतदारसंघातील श्रेयवादावरुन तर कधी नेत्यांची मर्जी राखण्यावरुन महायुतीतील नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवतात. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी पारदर्शक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित करत दोन लोकं आपणास भेटल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शरद पवारांवर हल्लाबोल केला. त्यानंतर, विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यावरही तिखट शब्दात टीका केली. त्यामुळे, महायुतीमधील नेत्यांमध्ये पुन्हा वार-पलटवार पाहायला मिळत आहे. कारण, अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी विखे पाटलांवर बोचरी टीका केलीय.

राधाकृष्ण विखेपाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता, आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री महोदयांवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा टोला मिटकरींनी लगावला आहे. विखे पाटील विसरले असावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. अजितदादांवर टीका करताना जरा जपून !अपेक्षा आहे भाजपश्रेष्ठी याची दखल घेतील, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. तसेच, बाकी विखे पाटीलजी आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बर का! उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा सांकेतिक टोलाही मिटकरी यांनी विखे पाटलांना लगावला आहे.

काय म्हणाले होते विखे पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजेच अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्यावरती टीका करत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यावर देखील घसरले. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा, असं म्हणत अजित पवारांवर  टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना संबोधित करत, साखर धोरणावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे, आता महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.