आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले,12 वर्षांचा वनवास….

मुंबई : ठाणे (Thane) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या सर्वच पदाचा आणि संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, अखेर आज त्यांनी शिवसेनेचा (Shivsena) गमछा गळ्यात घातला. आनंद परांजपे यांनी गेल्या काही दिवसात 2 वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. आता, शिवसेनेत त्यांना कुठल्या पदाची जबाबदारी देण्यात येणार, याची उत्सुकत आहे. तर, परांजपे यांना महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये शिवसेनेला राम राम करताना एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढवून घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसात परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही नाराजी दूर केली. त्यामुळेच त्यांच्या पक्ष प्रवेशाला शिंदेंनी हिरवा कंदील दाखवला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर, आज खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित आनंद परांजपे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला.

आनंद परांजपे हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती, विशेष म्हणजे त्यांनी गेल्या काही दिवसात 2 वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण कुठल्या पक्षात जाणार याबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. मात्र, त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, बोलताना आपली राष्ट्रवादीत कुठलीही नाराजी नसल्याचेही स्पष्ट केले. माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, कुठल्या अपेक्षेने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं नाही. संघटनेनं दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत, त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेते व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत, असे आनंद परांजपे यांनी म्हटलं.

मी स्वगृही परतलोय, वनवास संपत आलाय

कुठल्याही पदाच्या अपेक्षेनं मी शिवसेनेत प्रवेश केला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम, आणि माझा डीएनए हा शिवसेनेचाच आहे, जो कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करेल. पक्षसंघटनेत काम मला करायचं आहे, पक्षसंघटनेत मला जे काम दिलं जाईल ते मी जोमाने पार पाडेल, आज मी स्वगृही आलोय, असे आनंद परांजपे यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, प्रभू श्रीरामांनीही 14 वर्षे वनवास भोगला होता, मी 12 वर्षे वनवासात होतो, वनवास चांगलाच असतो, तो संपत आलाय, असेही परांजपे यांनी म्हटले.

हेही वाचा

तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

आणखी वाचा

Comments are closed.