अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी
चंद्रपूर : अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी दारूच्या बॉटल फोडत अवैध दारू (अवैध दारू) विक्रेत्याची चक्क झोपडी जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ही घटना घडली आहे. हिवरा हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असून अवैद्य दारूविक्रेत्यांनी एका शेतात तळ ठोकला होता. त्यामुळे नागपूर पोलिस कारवाईसाठी आले की दारुविक्रेता चंद्रपूरच्या सीमेत यायचा आणि चंद्रपूर पोलिस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याने हिवरा, साठगाव आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील त्रस्त महिलांनी याविरोधात मोर्चा उघडून त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून तो पेटवून दिला आहे.
या घटनेनंतर भिसी व भिवापूर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेत आरोपी अशोक सगरे आणि स्वामी बुचलवार यांना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकांची 9 जणांना धडक
ठाण्यातील उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौकात भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव कार चालवून 9 जणांना धडक दिलीय. यामध्ये चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा (हिट अँड रन) गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झालाय. कार चालक व्हीनस चौक परिसरातून कार भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा आणि काही नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमीने दिलीय. यातील दोघांवर खाजगी तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचुर झालाय. या अपघातात कार चालकासह चार जण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.