राघव चढ्ढांनी ‘आप’ सोडलं; आण्णा हजारे चिडले, म्हणाले, सत्ता आणि पैशासाठी पक्षांतर, कायदा व्हावा

अहिल्यानगर : देशाच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. आम आदमी पक्षामध्ये (AAP) गेल्या काही दिवसांपासून दूर होताना दिसत असलेले खासदार राघव चढ्ढा हे भाजपच्या जवळ गेले आहेत. राघव चढ्ढा यांच्यासह 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, तत्पूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेत आपण आदमी पक्ष सोडत असून राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे भाजपात विलिगीकरण करत असल्याचेही त्यांनी म्हटलं. आप पक्षातील या फुटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. आता ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे (Anna Hajare) यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देताना राजकीय पक्षांतर हे चीड आणणारं असल्याचं म्हटलं.

आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी पक्षाला राम राम करत भाजपाची वाट धरली आहे, त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. आप पक्षातील फुटीसंदर्भात अण्णा हजारे यांनी म्हणाले की, पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैसा यांच्या लालचमध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर होते. त्यामुळे, मनमर्जीप्रमाणे सत्ताबदलाचे काम होतात हे बरोबर नाही, असे म्हणत अण्णा हजारे यांनी दिल्लीत आम आदमी पक्षात झालेल्या राजकीय भूकंपावर संतापजनक प्रतिक्रिया दिली.

आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता पक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठिमागे लागत आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. हे जे चाललं आहे ते स्वार्थसाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता, आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही, असेही अण्णा हजारेंनी म्हटलं.

दरम्यान, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चड्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर सात जणांची नावे सांगितली. विशेष म्हणजे, 15 दिवसांपूर्वी चड्ढा यांना हटवल्यानंतर राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील आता भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यांच्यावर 10 दिवसांपूर्वीच ईडीने छापेमारी केली होती.

आपमधून भाजपमध्ये जाणारे खासदार

1. स्वाती मालीवाल
स्वाती मालीवाल जानेवारी 2024 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या. त्यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. त्यांनी आम आदमी पक्षातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या वर्षी तिच्या आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

2. अशोक कुमार मित्तल
अशोक कुमार मित्तल हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती आहेत. मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टीकडून ते राज्यसभेवर निवडून आले. अलीकडेच, आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. मात्र, 10 दिवसांपूर्वी ईडी छापेमारीत त्यांनी भाजपची वाट पकडली आहे.

3. संदीप पाठक
डॉ. संदीप पाठक हे एप्रिल 2022 पासून आम आदमी पार्टीकडून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. ते आयआयटी दिल्लीमध्ये सहायक प्राध्यापक होते आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. आम आदमी पार्टीमध्ये पाठक हे अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांनी पंजाबमधील ‘आप’च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

4. हरभजन सिंग
माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टी (आप) मधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते पंजाबमधून राज्यसभेचे खासदार झाला.

5. बलबीर सिंग सीचेवाल
बलबीर सिंग सीचेवाल हे पंजाब प्रांतात एक पर्यावरण-बाबा आणि संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यावरण आणि नदी संवर्धनाशी संबंधित अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2022 मध्ये आम आदमी पार्टीमधून झाली, ज्याने त्यांना राज्यसभेवर निवडून दिले.

6. विक्रमजीत सिंग साहनी
विक्रमजीत सिंग साहनी हे देखील एक समाजसेवक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी वर्ल्ड पंजाबी पार्लमेंटरी फोरमची स्थापना केली.

आणखी वाचा

Comments are closed.