दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूवर 2 वर्षांची बंदी; 'या' कारणामुळे बोर्डाने उचललं कठोर पाऊल

न्यूझीलंड आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू डग ब्रेसवेल याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) 2 वर्षांसाठी बंदी घातली आहे. 35 वर्षीय ब्रेसवेलने सामना सुरू होण्यापूर्वी कोकेनचे सेवन केले होते. विशेष म्हणजे, त्याने स्वतःची चूक मान्य केली आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी चेम्सफोर्ड येथे एसेक्स आणि समरसेट यांच्यातील ‘डिव्हिजन वन’ सामन्यादरम्यान ही बाब समोर आली.

लंडनच्या वाडा (WADA) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत त्याच्या शरीरात कोकेन आणि बेंजोइलेकगोनिन (कोकेनचे अंश) आढळले. ब्रेसवेलने स्वीकारले की, त्याने 24 सप्टेंबरची रात्र आणि 25 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत अमली पदार्थाचे सेवन केले होते. यामुळे ईसीबीच्या अँटी-डोपिंग नियमांमधील कलम 2.1 आणि 2.2 च्या उल्लंघनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या बंदीमुळे त्याला आता दोन वर्षे क्रिकेटपासून दूर राहावे लागेल.

ब्रेसवेलची क्रिकेट कारकीर्द पाहिल्यास त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 कसोटी सामन्यांत 74, 21 वनडे सामन्यांत 26 आणि 20 टी20 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल (IPL) 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने एक सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळताना समरसेटविरुद्ध त्याने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द आता अमली पदार्थांच्या सेवनामुळे अडचणीत आली आहे.

Comments are closed.