मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्या, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य
अहिल्यानगर : जगाचं लक्ष सध्या अमेरिकाइस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे लागले असून युद्धाविराम (War) कधी होईल, याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर होत असून हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भारतानेही युद्धसंदर्भाने भूमिका स्पष्ट करत युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन संपर्कही केला होता. त्यातच, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून युद्धजन्य परिस्थितीत भारताने शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.
जगातील वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
यु्द्धाच्या पार्श्वभूमीवर अलीकडील घटनांमध्ये निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांवर होत असलेल्या परिणामांच्या बातम्या अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहेत. युद्ध आणि संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांनाच बसतो, ही बाब लक्षात घेऊन जागतिक स्तरावर भारताकडून शांततेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताची परंपरा ही अहिंसा, शांतता आणि संवादाची राहिली आहे. इतिहासात भारताने नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राकडून मानवता आणि शांततेचा संदेश जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जगाला शस्त्राची नव्हे, संवादाची गरज
आजच्या जगाला शस्त्रांची नव्हे तर विश्वास, सहकार्य आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, तर संवादातून समाधान आणि स्थैर्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात भारताने मानवतेच्या आणि शांततेच्या बाजूने पुढे येत संवाद आणि सहकार्याचा मार्ग मजबूत करावा, अशी अपेक्षाही हजारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.