काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेल्या लाठीमारावर, अनुराग कश्यपने पोलिसांच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित
दिल्लीतील CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या ‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीमारानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही पोलिसांच्या कारवाईवर तीव्र टीका केली. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी आदेश चुकीचा वाटत असतानाही त्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, गायक विशाल ददलानी यांनीही सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर टीका करत आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला.
शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर बलप्रयोग केल्याचा आरोप करत हुमा कुरेशी, भूमी पेडणेकर, अनुराग कश्यप, विशाल ददलानी, नंदिता दास, सुतापा सिकदर, सोनम बाजवा आणि पार्वती तिरुवोथू यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
हुमा कुरेशीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, आंदोलनादरम्यान समोर आलेली दृश्ये अत्यंत वेदनादायक आहेत. शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर लाठ्यांचा वापर करण्याऐवजी संयम, संवाद आणि लोकांचे म्हणणे ऐकण्याची गरज होती, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि सरकारकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि नागरिकाला सलाम केला.
भूमी पेडणेकर हिने “हिंसा हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही” असे स्पष्ट करत शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांकडे लक्ष वेधले. पेपरफुटी, परीक्षांमधील अनियमितता, समान संधींचा अभाव, शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांवरील वाढता ताण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. आंदोलनातील प्रत्येक मुद्द्याशी सहमत नसले तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न संवादातून सोडवले गेले पाहिजेत, असेही अधोरेखित केले.
Comments are closed.