फर्स्टी – राणी चेन्नम्माचा काकती किल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> प्रांजल वाघ

[email protected]

बेळगाव
शहराच्या उत्तरेस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर वसलेला काकतीचा किल्ला हा केवळ एक छोटेखानी किल्ला नसून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागातील ज्वलंत पराक्रम, राजकीय उलाढाली व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. एका टेकडीवर दिमाखात उभा असलेला हा किल्ला आजही इतिहासप्रेमींना आपल्या वैभवशाली भूतकाळात घेऊन जातो.

काकती गावातून अवघ्या काही मिनिटांतच गाठता येणाऱया या किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे ही कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची जन्मभूमी आहे!
23 ऑक्टोबर 1778 रोजी काकतीचे जहागीरदार धूळप्पा देसाई आणि पद्मावती यांच्या पोटी याच किल्ल्यात चेन्नम्मांचा जन्म झाला. किल्ल्याच्या तटबंदीच्या सावलीत चेन्नम्मांचे बालपण गेले. लहानपणीच तलवारबाजी, धनुर्विद्या आणि घोडेस्वारीचे धडे त्यांनी काकती किल्ल्याच्या आवारात गिरवले. पुढे कित्तूरचे राजे मल्लसर्जा देसाई यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी पुकारलेला पहिला सशस्त्र उठाव भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.

काकती किल्ल्याचा इतिहास मराठा साम्राज्याच्या राजकीय पटलाशी थेट जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर आणि पुढे पेशवेकाळात बेळगाव-कित्तूर हा संपूर्ण परिसर मराठ्यांच्या थेट प्रभावाखाली आला. काकती दुर्ग हे पेशव्यांचं महत्त्वाचं लष्करी आणि प्रशासकीय ठाणं मानलं जाई. मराठा राजवटीत काकतीचे देसाई घराणे पेशव्यांच्या छत्रछायेखाली काम करीत असत. उत्तरेकडून येणाऱया शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आणि मुलुखगिरीदरम्यान महसूल (चौथाई) गोळा करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. मराठा प्रशासनामुळे या काळात काकती किल्ल्यातील राजकीय व्यवहार आणि मोडी लिपीतील सनदा मराठीत लिहिल्या जात असत. खुद्द राणी चेन्नम्मांचे प्रारंभिक शिक्षण मराठी, कन्नड आणि संस्कृतमध्ये याच किल्ल्यात झाले, जे या भागातील समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे.

स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हा किल्ला चुना न वापरता केवळ अवाढव्य पाषाणांची रचना करून (अब्-stदहा स्asदहब्) बांधला आहे. येथे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी उंच बुरुज आणि खडकात कोरलेली पाण्याची टाकी आजही पाहायला मिळतात.

काळाच्या ओघात अवशेष उरले असले तरी काकतीचा हा बुलंद किल्ला राणी चेन्नम्मांच्या शौर्याची आणि मराठाकालीन इतिहासाची अमर साक्ष देत उभा आहे.

Comments are closed.