चाचणी – तालबद्ध भावना लहर

>> सुधाकर वसईकर

कवी अशोक कोतवाल हे समकालीन सामाजिक व राजकीय वास्तवावर तसेच मानवी भावनांवर अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने भाष्य करणारे कवी म्हणून मराठी साहित्यात सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांचे ‘मौनातील पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’, ‘नुसताच गलबला’ आणि ‘खांदे सुजलेले दिवस’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. यासोबतच त्यांचे ललित लेखसंग्रह आणि बाल कवितासंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले असून त्यांच्या लेखनाला अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अलीकडेच अष्टगंध प्रकाशनाने त्यांचा ‘दगडांना फुटली पाने’ हा पाचवा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहाचे शीर्षकच कमालीचे काव्यात्मक आणि प्रतीकात्मक आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की, “निर्मळ चित्तें झालीं नवनीतें पाषाणा पाझर फुटतीरे?” म्हणजेच निर्मळ मनाने वागल्यास दगडासारख्या कठोर माणसाचे मनही मेणासारखे मऊ होते आणि त्याला प्रेमाचा पाझर फुटतो. संतांच्या याच विचारांचा धागा कवी अशोक कोतवाल यांच्या कवितेतही ओवलेला दिसतो. कवी म्हणतात –

ततो ऋतू कोणता होता

दगडांना फुटली पाने

शब्दांचे होऊन पक्षी

अर्थांचे टिपती दाणे…

कवीने विचारलेला हा ऋतू प्रत्यक्षात ‘सृजनशीलतेचा ऋतू’ आहे, जो सुस्त मनातील मरगळ झटकून नवा उत्साह निर्माण करतो. शब्दांना पक्षांची उपमा देऊन ते शब्दरूपी पक्षी मुक्तपणे विहरत अर्थपूर्ण आशय टिपत आहेत, अशी सुंदर कल्पना कवीने नादमाधुर्याच्या माध्यमातून मांडली आहे. मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या समस्त संतांनी अभंग, ओवी, भारुड, गवळण आणि श्लोक अशा लोकसुलभ, लयबद्ध व गेय काव्यातूनच समाजप्रबोधन केले. हाच वारसा पुढे चालवत, आजतागायत मुक्तछंदात लेखन करणाऱया अशोक कोतवाल यांनी या संग्रहाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्या लयबद्ध आणि गेय कवितांचा स्वतंत्र संग्रह रसिकांसमोर आणला आहे.

जीवनात सुख-दुःखाचे कितीही चढ-उतार आले, तरी ज्यांना जगण्याची आंतरिक लय सापडते, ते बाह्य संकटांनी डगमगत नाहीत. कवीने आपल्या अशाच कलंदर आयुष्याचा पट साध्या व नादमय शब्दांत मांडला आहे –

या जगण्याने मला बनवले

असे कलंदर आणि बिलंदर

लढलो नाही कधी तरीही

हात मिळवण्या आले कलंदर

हा संग्रह ‘दुःखामधले माणिकमोती’, ‘वेळाच्या घुंगुरमाळा’, ‘शुभ-अशुभांची गुंत’ आणि ‘सय-बाधली दुपार’ अशा चार वैशिष्टय़पूर्ण विभागांत विभागलेला आहे. या कवितांमधून मानवी नात्यांचा मागोवा घेत असतानाच कवीला सद्यस्थितीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि दडपशाही कदापि मान्य नाही, धूर्त छाकटय़ा लोकांना खडे बोल सुनावले आहेत. ते लिहितात –

मळेल माझा माथा असल्या

चरणांकडे ना गेली धाव

अस्मानावर मला मी नेले

अन धरतीवर लिहिले नाव

असं असलं तरी माणसाचे जीवन क्षणभंगुर आणि नश्वर आहे, हे अंतिम सत्य कवीने अत्यंत हळुवारपणे मांडले आहे.

कोण असं पायाशिवाय

देहामधून चालत जातं?

जाताना मला माहीत नाही

फूल कसं खुडून नेतं

मृत्यू हा अत्यंत शांत, अदृश्य आणि अपरिहार्य आहे; तो कधी, कसा आणि कोणत्या पायांनी देहात प्रवेश करतो आणि आयुष्याचे उमललेले फूल अलगद खुडून नेतो, हे कोणालाच समजत नाही. मृत्यूची ही अथांगता आणि शांतता अटळ असली, तरी माणसाने त्याचे भय न बाळगता, कोणत्याही दबावाशिवाय आपले आयुष्य स्वतच्या मस्तीत आणि आनंदाने जगले पाहिजे असं ठामपणे कवीने बिंबविले आहे.

बदलते ऋतुमान आणि मानवाचे आंतरिक भावविश्व यांचा सुरेख संगम या कवितांमध्ये आढळतो. कवीची भाषा अत्यंत साधी, सोपी परंतु थेट काळजाला भिडणारी आहे. दगडातूनही पाझर फुटू शकतो, हा सकारात्मक दृष्टिकोन कवितांमधून अधोरेखित होतो. मानवी स्वभावाचे विदारक वास्तव मांडताना कवी म्हणतात –

किती गाळले पुन्हा पुन्हा मी, दुःखमाधले माणिक मोती

तूला मढवाया, रे जीवन। गेलो विसरून नातीगोती

या ओळींमधून कवीने मानवी प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवले आहे. माणूस अनेकदा भविष्यातील सुखाच्या आभासी कल्पनेसाठी वर्तमानकाळातील खरीखुरी नाती पणाला लावतो. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या हव्यासात आपण ‘माणसे’ गमावून बसतो आणि शेवटी आयुष्य रितेच राहाते, हे अतिशय हळवेपणाने कवितेत आले आहे.

कवीने स्वतच्या अनुभवांतून सकल समाजाची (समष्टीची) आशयघन आणि अर्थपूर्ण कविता साकारली आहे. यामध्ये मुलीसाठी व्याकुळ झालेला बाप आणि त्याची व्यथा मांडणाऱया कविता, भ्रष्ट व्यवस्थेची मिश्किलतेने खिल्ली उडवणारी ‘चिरीमिरी’ कविता आणि अहिंसेचा संदेश देणारी ‘अजिंठा’ लेण्यांवरील सुंदर कविता, यासारख्या कविता आणि एकूणच संग्रहातील सर्वच 63 कविता उल्लेखनीय आहेत. जागेअभावी काही कवितांची सविस्तर नोंद घेणे शक्य नसले, तरी या कवितांचा खरा आनंद घेण्यासाठी हा संग्रह मुळातूनच वाचायला हवा.

अष्टगंध प्रकाशनाने या संग्रहाची निर्मिती अतिशय दर्जेदार केली आहे. जितेंद्र साळुंके यांनी केलेले मुखपृष्ठ आणि अंतर्गत रेखाटने कवितांच्या लयीला व भावछटांना पूरक ठरली असून यामुळे काव्यसौंदर्य अधिकच खुलले आहे. तसेच स्वप्नील चव्हाण यांनी संग्रहाची केलेली पाठराखण नेमकेपणाने संग्रहाची ओळख करून देणारी आहे. सामान्य माणसाच्या जगण्याशी साधर्म्य सांगणाऱया या कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात आणि म्हणूनच हा काव्यसंग्रह संग्राह्य असा झाला आहे.

दगडांना फुटली पाने

कवी ः अशोक कोतवाल

प्रकाशक: अष्टगंध प्रकाशन

पृष्ठ: ८१ ता किंमत: 250/-

Comments are closed.