रंगयात्रा – द विंडमिल अॅट विक बेई डुर्स्टेड
>> दुष्यंत पाटील, [email protected]
राउस्डाल या विख्यात चित्रकाराचं ‘द विंडमिल अॅट विक बेई डुर्स्टेड’ हे चित्र. राजेशाही किल्ले आणि जुनी धार्मिक बंधने यापलीकडे जात स्वतःचे कष्ट, स्वाभिमान, आत्मसन्मान जपणारी या चित्रातील प्रतिकं त्यांच्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची दखल घ्यायला लावणारी आहेत.
डच लोकांचं अतिशय आवडतं असणारं एक पेंटिंग म्हणजे ‘द विंडमिल अॅट विक बेई डुर्स्टेड.’ हे चित्र पाहताना त्यांना अतिशय अभिमान वाटतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या चित्रात एक पवनचक्की, नदी, काही ढग आणि थोडासा निसर्ग दिसतो. त्या काळातल्या इतर कुठल्याही निसर्गचित्रासारखंच हे चित्र दिसतं. मग या चित्राकडे पाहिल्यावर त्यांना इतका अभिमान का वाटावा? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या डचांच्या इतिहासात मिळतं.
सतराव्या शतकातला नेदरलँड्स हा एक नवा, लहानसा देश होता. स्पेनच्या साम्राज्याविरुद्ध तब्बल ऐंशी वर्षं लढून, 1648 मध्ये त्याला अधिकृत स्वातंत्र्य मिळालं. खरं तर नेदरलँड्स म्हणजे ‘खालचा प्रदेश.’ या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. डच लोकांनी शतकानुशतकं बांध घालून, पाणी उपसून समुद्रातून जमीन मिळवली. एक प्रसिद्ध म्हण आहे : ‘जग देवानं बनवलं, पण हॉलंड (म्हणजेच नेदरलँड्सचा महत्त्वाचा भाग) डचांनी बनवलं.’ एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे राजेशाही नव्हती, तर व्यापाऱ्यांनी चालवलेलं प्रजासत्ताक होतं!
या छोटय़ा देशानं अवघ्या काही दशकांत जगावर आर्थिक वर्चस्व मिळवलं. त्यांची ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’ ही जगातल्या पहिल्या मोठय़ा शेअर बाजार कंपन्यांपैकी एक मानली जाते. व्यापारामुळे डच लोकांकडे प्रचंड संपत्ती जमा झाली. या संपत्तीमुळे हॉलंडमध्ये एक मोठा मध्यमवर्ग तयार झाला. यात व्यापारी, कारागीर, दुकानदार लोक यायचे. या वर्गातल्या लोकांना घरात चित्रं लावायची हौस होती! इतर देशांत चित्रं प्रामुख्यानं चर्च, राजे आणि सरदारांसाठी बनायची. पण हॉलंडमध्ये मात्र चित्रं बाजारात विकली जायची. चित्रांची खरेदी करणारे लोक मध्यमवर्गीय असल्यानं चित्रांचे विषयही वेगळे असायचे. तिथल्या मध्यमवर्गीय लोकांना देवदेवता किंवा राजांपेक्षा आपलं स्वतःचं जग पाहायचं होतं. आपली घरं, आपले कालवे, आपली शेतं, आपलं आभाळ वगैरे. त्यामुळे तिथे ‘निसर्गचित्र’ हा प्रकार अफाट लोकप्रिय झाला.
‘द विंडमिल अॅट विक बेई डुर्स्टेड’ हे चित्र राउस्डाल नावाच्या विख्यात चित्रकारानं 1670 मध्ये रंगवलं. या चित्राची कुणी खास ऑर्डर दिल्याचा पुरावा मिळत नाही. बहुधा ते खुल्या बाजारात विकण्यासाठीच काढलं गेलं असावं. कारण त्या काळी बहुतेक डच चित्रं बाजारात विकण्यासाठीच काढली जायची. विक बेई डुर्स्टेड हे तिथलं एक गाव आहे. ‘लेक’ नावाच्या नदीकाठी वसलेलं. तिथे पवनचक्की होती, डुर्स्टेडचा किल्ला होता, सेंट जॉनचं चर्च होतं. पण राउस्डालने हे दृश्य जसंच्या तसं रंगवलं नाही. तो एखाद्या चित्रपट दिग्दर्शकासारखा ‘सेट’ रचायचा. इमारती थोडय़ा हलवायच्या, पवनचक्की अधिक उंच, अधिक भव्य करायची, आभाळ अधिक नाटय़मय करायचं.
राउस्डालनं या चित्रात नेदरलँड्सचे सगळे खास घटक एकत्र आणले : सपाट, सखल जमीन, पाणी, विस्तीर्ण आभाळ आणि हे सगळं एकवटलं ते तितक्याच ‘डच’ अशा पवनचक्कीवर. या सगळ्या गोष्टींचं नेदरलँड्सच्या जडणघडणीमध्ये खास स्थान होतं. भौगोलिकदृष्टय़ा नेदरलँड्सचा बहुतांश भूभाग हा समुद्राच्या पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे थोडा जरी पूर आला तरी शेकडो गावं एका रात्रीत पाण्याखाली जायची. डच लोकांनी या आढाळपाळ समुद्राला हरवण्यासाठी प्रचंड मोठे बांध बांधले. पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी पवनचक्क्या उभारल्या! त्यामुळे डच माणसासाठी पवनचक्की ही केवळ धान्य दळण्याची गिरणी नव्हती; ती त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या स्वातंत्र्याची आणि निसर्गावर विजय मिळवणाऱ्या त्यांच्या तंत्रज्ञानाची देवता होती!
चित्रामध्ये पवनचक्कीच्या मागे दूर क्षितिजावर दोन ऐतिहासिक इमारती धूसर दिसतात. त्यातली पहिली म्हणजे सेंट जॉन चर्चचा गॉथिक मनोरा. आणि दुसरी म्हणजे डय़ुस्टेडच्या प्राचीन राजवाडय़ाचे अवशेष. चर्च हे ‘धर्माचे’ प्रतीक आहे, तर राजवाडा हा ‘सरंजामशाही आणि सत्तेचे’ प्रतीक आहे. पण चित्रकारानं या दोघांना मागे अंधारात, धूसर करून टाकलंय. आणि सर्वात पुढे, दिमाखात प्रकाशात पवनचक्कीला दाखवलंय. याचा अर्थ असा की, डच माणसासाठी जुने राजेशाही किल्ले आणि जुनी धार्मिक बंधने आता महत्त्वाची राहिलेली नव्हती; त्याच्यासाठी त्याचे स्वतःचे कष्ट, विज्ञानानं उभी केलेली पवनचक्की आणि स्वतचा घाम हीच खरी ताकद होती. इतकी महान कलाकृती बनवणाऱ्या राउस्डालचं मात्र एकही पोर्ट्रेट आज अस्तित्वात नाही. डच सुवर्णयुगात रेम्ब्रॉनसारख्या चित्रकारांनी डझनावारी ‘सेल्फ-पोर्ट्रेट्स’ काढली, पण राउस्डालने एकही नाही. आजच्या सेल्फीच्या जमान्यात हे अविश्वसनीय वाटतं!
Comments are closed.