असद आलम सयाम हे बांगलादेशचे नवे उच्चायुक्त आहेत.
भारत सरकारने नियुक्तीला दिली मंजुरी : दिल्लीत बांगलादेशचा नवा चेहरा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बांगलादेशचे विदेश सचिव असद आलम सियाम यांच्या भारतातील बांगलादेशचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्तीला भारत सरकारने औपचारिक मंजुरी दिली आहे. भारताकडून मंजुरीचे पत्र मंगळवारी दुपारी ढाक्यातील बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाला सोपविण्यात आले आहे.
बांगलादेशचे वर्तमान उच्चायुक्त एम. रियाज हमीदुल्लाह हे ऑक्टोबरच्या मध्याला स्वत:चे नवे पद सांभाळणार आहेत. हमीदुल्लाह यांना संयुक्त राष्ट्रसंघात बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. याचमुळे आता असद आलम सियाम हे नवी दिल्लीत बांगलादेशचे उच्चायुक्त म्हणून काम सांभाळणार आहेत.
असद आलम सियाम हे एक अनुभवी मुत्सद्दी आहेत. 1995 मध्ये ते बांगलादेश विदेश सेवेत सामील झाले होते. दीर्घकाळापासून मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात कार्यरत सियाम आता भारतासारख्या महत्त्वपूर्ण शेजारी देशात बांगलादेशचे प्रतिनिधित्व करतील.
सियाम यांच्या नियुक्तीसाठी भारताकडून औपचारिक सहमतीची मागणी बांगलादेशने केली होती. ही मंजुरी मिळाल्याने सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. भारत ही मंजुरी रोखत आहे किंवा मंजुरी देण्यास विलंब करत असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत होता. परंतु आता प्रक्रिया पूर्ण झाल्याने हे सर्व दावे खोटे ठरले आहेत.
याचबरोबर बांगलादेशात आता विदेश सचिव पद रिक्त होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील बांगलादेशचे माजी प्रतिनिधी सलाहुद्दीन नोमान चौधरी हे पुढील विदेश सचिव होतील अशी चर्चा सुरु आहे. चौधरी हे यापूर्वी भारतातील बांगलादेशचे उप-उच्चायुक्त राहिले आहेत. याचमुळे भारतासोबत त्यांचे जुने संबंध देखील आहेत.
सियाम हे सुमारे एक वर्ष अमेरिकेत बांगलादेशचे राजदूत होते. तर त्यापूर्वी 2023-24 मध्ये ते ऑस्ट्रियामध्ये राजदूत राहिले होते. 2017-21 पर्यत त्यांनी फिलिपाईन्समध्ये राजदूत म्हणून काम केले होते. याचबरोबर बांगलादेशच्या वतीने त्यांनी ब्रिटन, इंडोनेशिया, थायलंडमध्येही काम केले आहे.
Comments are closed.