अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती; अमोल मिटकरींचा दावा
अहिल्यानगर : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (अशोक खरात) प्रकरण सध्या गाजत असून विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही याच प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही याप्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे. आता, याप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली.
अशोक खारतच कायदा महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे, आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहित झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबाचे संबंध असू शकतात. कारण, या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली, अशोक खरात आणि अजित दादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. तसेच, संत परंपरा असलेल्या राज्यात कुणी करंगळ्या कापल्या, माध्यमात आलेले फोटो खरे आहेत का? या सगळ्याचा तपास निष्पन्न होईल. कोणालाही सरकार पाठीशी घालणार नाही याचा मला विश्वास आहे.
बाबाच्या आश्रमाला पाणीवाटप
आता त्या बाबाचं गाव सुद्धा बाबाच्या विरोधात गेले आहे, राज्यात अंनिसचा कायदा आहे. एवढे प्रकार घडत असताना यांचे लक्ष असायला पाहिजे होतं. त्याला पाणी कसे दिले, कोणाच्या काळात दिले, कोणकोणत्या मंत्र्यांनी सहकार्य केले. आता कोणकोण मंत्री आहेत. महायुती असो किंवा महायुती जे कोणी आहेत ते सुटणार नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांच्या बायका आहेत का?
याप्रकरणात जर एखाद्या अधिकाऱ्याचे नाव आज समोर येत असेल तर धक्कादायक आहे, जर पाणी आरक्षित होत असेल तर तो साधासुधा बाबा नाही हे निश्चित. निरक्षर लोकांना नाव ठेवण्यापेक्षा साक्षर लोक आहारी गेले हे वास्तव. बाबाची प्रॉपर्टी दोन हजार कोटींपेक्षा जास्त, हा पैसा आला कुठून? अधिकाऱ्यांचे लागेबांधे काय होते हे आता समोर आलं पाहिजे. समोर आलेले व्हिडिओ 57 नाही तर 500 च्या वर असे व्हिडिओ असल्याची माहिती आहे. त्यामुळे, अधिकाऱ्यांच्या बायका त्यात आहेत का अजून कोणी? हे बघाव लागेल, असेही अमोल मिटकरींनी म्हटले.
अजित दादांचा विषय आज मागे पडला
महायुती सरकारमध्ये शाहू-फुले-आंबेडकर हा विचार सांगणारा नेता म्हणजे अजित दादा होते, अशा नेत्याबद्दल अर्थसंकल्प अधिवेशनात कोणी बोलायला तयार नाही. कोणी पायऱ्यांवर बसून देखील मागणी केली नाही. 296 या प्रस्तावाला देखील बगल दिली गेली. अजितदादानी ज्यांना मोठे केले ती मूग गिळून गप्प का? आज हा विषय मागे देखील पडेल. मात्र, जनता उत्तर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, अजित दादांना संपवण्याचे षडयंत्र समोर येईलच, असे मिटकरी यांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.