मनी लाँड्रिंग प्रकरणी स्वयंघोषित बाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने मंगळवारी स्वयंघोषित बाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप असलेल्या खरातला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या आठवड्यात ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या’च्या (PMLA) तरतुदींनुसार अटक केली होती. त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी त्याला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

अशोक खरातच्या पुढील कोठडीची सध्या आवश्यकता नाही; परंतु भविष्यात गरज भासल्यास, ते पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी करतील, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

मनी लाँड्रिंगद्वारे फिरवण्यात आलेल्या 47 कोटींहून अधिक रकमेचा मुख्य सूत्रधार आणि प्राथमिक लाभार्थी खरातच होता, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. खंडणी वसुली, धार्मिक फसवणूक आणि अनेक महिलांवर अंमली पदार्थांचा वापर करून अत्याचार केल्याच्या आरोपांखाली नाशिक पोलिसांनी खरातविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत ईडीने 6 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच खरातने खंडणी वसुलीचे एक मोठे रॅकेट चालवल्याचा आणि बेनामी बँक खात्यांद्वारे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.

खरातने राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपल्या भक्तांच्या संमतीशिवाय, त्यांच्याच कागदपत्रांचा वापर करून 60 स्वतंत्र बँक खाती उघडली होती, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Comments are closed.