लोटे येथील घातक पीफास उत्पादनाबाबतही भूमिका मांडावी, सचिन कदम यांचे प्रमोद जठार यांना आवाहन
कोकणातील जनता विकासाच्या विरोधात नाही, मात्र विनाशकारी प्रकल्प आणून जर कोकण उद्ध्वस्त करणार असाल तर अशा प्रकल्पाविरोधात कोकणी जनता ठामपणे उभी राहील. रिफायनरीमुळे कोकणातील दोन लाख रोजगार गेले असे वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांनी लोटे एमआयडीसीची परिस्थिती पाहावी. पीफाससारखे घातक रसायनाचे उत्पादन करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गेनिकबाबत भाजप आणि आमदार प्रमोद जठार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांनी केले आहे.
आमदार प्रमोद जठार यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेली टीका ही वस्तुस्थितीपासून दूर, दिशाभूल करणारी आणि कोकणाच्या जनभावनांचा अपमान करणारी आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र विनाशकारी, पर्यावरणाला घातक आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या प्रकल्पांविरोधात ती ठामपणे उभी आहे आणि राहील असे चिपळूण शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत कोकणात परप्रांतीय भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना सरकारी तिजोरीतून करोडपती करण्याचा डाव सुरू असल्याची जनतेत तीव्र भावना आहे. त्यामुळे स्थानिकांचा संशय अधिकच बळावत आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर काहींचे आर्थिक हितसंबंध आणि अपेक्षित मोबदले हुकल्याची चर्चा जनतेत सुरू आहे, असा टोला शहरप्रमुख सचिन कदम यांनी लगावला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन आधीच संपादित करण्यात आली आहे. मग त्या संपादित जमिनीवरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभारण्याऐवजी पुन्हा नव्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा घाट का घातला जात आहे? कोकणातील आणखी किती गावे उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा मानस आहे? स्थानिकांचा विश्वास संपादन करण्याऐवजी नव्याने जमीन संपादन करून कोकणातील जनतेच्या डोक्यावर पुन्हा विस्थापनाची तलवार का लटकवली जात आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे असा सवाल सचिन कदम यांनी उपस्थित केला आहे.
दोन लाख रोजगारांची भाषा करणाऱ्यांनी आधी गेल्या बारा वर्षांच्या सत्ताकाळाचा हिशोब द्यावा. आम्ही तर म्हणतो दोन लाख नव्हे, वीस लाख रोजगार द्या. कुणी तुमचे हात बांधले आहेत? कोकणातील युवकांना रोजगार हवा आहे, पण आपल्या मातीच्या, आरोग्याच्या आणि अस्तित्वाच्या किंमतीवर नको तर पर्यावरणपूरक प्रकल्प आणा असे आवाहन कदम यांनी केले.
Comments are closed.