सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला, पण न्यायालयात अशोक खरातचे वकील पहिल्यांदाच भारी पडले; भो
अशोक खरात नाशिक कोर्टात सुनावणी : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आज न्यायालयात मोठी घडामोड पाहायला मिळाली. महिला अत्याचाराच्या आठव्या गुन्ह्यात तपास यंत्रणेने (SIT) पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद सरकारी पक्षावर भारी पडल्याने न्यायालयाने खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Ashok Kharat Nashik Court Hearing: नेमकं काय घडलं न्यायालयात?
अशोक खरातला आज ‘व्हीसी’द्वारे (Video Conferencing) न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षाने असा युक्तिवाद केला की, खरातच्या ओकस कार्यालयातील झाडाझडतीत काही महत्त्वाचे पुरावे, विशेषतः ‘काळा दगड’ आणि इतर वस्तू मिळाल्या आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करताना तो काहीतरी पुटपुटत असे, त्याबाबत अधिक तपास करायचा आहे. पीडित कुटुंबाची त्याने आर्थिक फसवणूक केल्याचाही संशय असून, आरोपीच्या समक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
Ashok Kharat Nashik Court Hearing: आरोपीच्या वकिलांचा पलटवार
तपास यंत्रणेचा युक्तिवाद खोडून काढताना आरोपीच्या वकिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी विचारले की, “गेल्या नऊ गुन्ह्यांत ज्या गोष्टींचा तपास झाला, त्यात आता नव्याने काय शोधणार?” काळा दगड आणि चिंचोके यांचा काय तपास करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आर्थिक व्यवहारांचा संशय आहे असे इतर गुन्ह्यात नमूद नाही, मग आताच हे कसे आले?” असा सवालही त्यांनी केला. CCTV आणि जुन्या तपासाचा दाखला देत त्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा प्रभावी युक्तिवाद केला.
Ashok Kharat Nashik Court Hearing: न्यायालयाचा निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांनी SIT ची पोलीस कोठडीची मागणी अमान्य केली. परिणामी, अशोक खरातचा मुक्काम आता पोलीस कोठडीतून हलवून न्यायालयीन कोठडीत करण्यात आला आहे. त्याला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ashok Kharat Nashik Court Hearing: नवव्या गुन्ह्यात पुन्हा घेणार ताबा?
जरी आठव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी अशोक खरातच्या अडचणी संपलेल्या नाहीत. फसवणुकीच्या नवव्या गुन्ह्यात खरातचा पुन्हा ताबा मिळवण्यासाठी SIT ने न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) पुन्हा एकदा या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार असून, SIT खरातला पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.