धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण….

नाशिक: नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठ्या प्रमाणावर खुलासे समोर येत आहेत. त्याच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एका कापड विक्रेत्याला ‘कृष्णाचा अवतार’ असल्याचे भासवून लुटल्याचा हा प्रकार समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि बड्या नेत्यांची आर्थिक लूट करणाऱ्या अशोक खरातचा (Ashok Kharat) आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. व्यवसायात वृद्धी करून देण्याचे आमिष दाखवून एका कापड विक्रेता पती-पत्नीची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तक्रारदार कापड विक्रेता व्यावसायिक २०२२ मध्ये आपल्या व्यवसायातील चढ-उतार कमी व्हावेत आणि प्रगती व्हावी, या हेतूने अशोक खरातकडे गेले होते. यावेळी खरातने संधी साधून आपण ‘कृष्णाचा अवतार’ असल्याचे त्यांना भासवले. तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी दैवी शक्तीचे मंत्र घातलेले रत्न धारण करावे लागतील, असे सांगून त्याने या दांपत्याला आपल्या जाळ्यात ओढले.

सोन्याच्या अंगठ्या आणि बनावट हिरे

खरातने या व्यावसायिकाला दोन पुष्कराज रत्न आणि एक हिऱ्याची अंगठी देण्याचे मान्य केले. ही रत्ने अंगठीत बसवण्यासाठी त्याने व्यावसायिकाकडून २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. “मी साक्षात कृष्णाचा अवतार असल्याने यावर विशेष मंत्रोपचार करावे लागतील, त्यानंतरच गुरुवारी या अंगठ्या परिधान करा,” असे सांगून त्याने या दांपत्याचा विश्वास संपादन केला.

असा झाला उलगडा

गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातची अघोरी कृत्ये आणि फसवणुकीचे प्रकार टीव्ही व वर्तमानपत्रातून समोर येऊ लागले. हे पाहून संबंधित व्यावसायिक पती-पत्नीला संशय आला. त्यांनी खरातने दिलेल्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे सोन्याच्या दुकानात नेऊन तपासले असता, ते सर्व बनावट आणि खोटे असल्याचे निष्पन्न झाले. खरातने सोन्याच्या अंगठ्या स्वतःकडे ठेवून या दांपत्याला कवडीमोल किमतीचे दगड देऊन गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, दररोज समोर येणाऱ्या या नवीन प्रकरणांमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

भोंदू अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल

एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील राजेंद्र भागवत  व्यावसायिकाला व्यवसायिक वृद्धीसाठी खडे, रत्न देऊन बनावट अंगठी विकून लाखोंची फसवणूक केल्या प्रकरणी खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कडील 20 ग्राम वजनाची  सोन्याची अंगठी स्वतः जवळ ठेवून त्याला पितळी धातूच्या अंगठीमध्ये पुष्कराज आणि हिऱ्याचे रत्न देऊन 2 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 75 हजार रुपयांचा पुष्कराज रत्न त्याने तक्रारदाला विकला तसेच तक्रारदार कडुन दोन सोन्याच्या अंगठ्या अशोक खरातने घेतल्या आणि रत्नजडित अंगठीच्या नावाखाली बनावट अंगठी देऊन फसवणूक केली.

आणखी वाचा

Comments are closed.