‘त्याच्या आत्मविश्वासाला तडा..’, यशस्वी जयस्वालला वनडे संघातून वगळल्याने आर अश्विनचा निवड समितीवर संताप!

भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Team india’s Former Cricketer R Ashwin on Yashsvi jaiswal) यशस्वी जयस्वालबाबत मोठं विधान केलं आहे. यशस्वी जयस्वालला भारतीय वनडे संघातून वगळण्यात आल्याने अश्विन नाराज आहे. बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, या दोन्ही मालिकांसाठी यशस्वी जयस्वालची वनडे संघात निवड करण्यात आलेली नाही. निवड समितीचा हा निर्णय अश्विनला आवडलेला नाही. त्याने यशस्वीच्या समर्थनार्थ आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, जर शुबमन गिल शेवटचे दोन वनडे सामने खेळणार नसेल, तर त्याच्या जागी यशस्वी जयस्वालची निवड व्हायला हवी होती. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्याबाबतीतली परिस्थिती मी समजू शकतो. पण यशस्वी जयस्वालला खेळण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे मला वाटते. त्याची फलंदाजी पाहिली, तर तो दोन-तीन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने खेळायचा, तसा आता खेळताना दिसत नाही.

यशस्वी जयस्वालने जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात 86 चेंडूंमध्ये नाबाद 110 धावांची खेळी केली होती. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतग्रस्त झाल्यामुळे जयस्वालला त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. अश्विनच्या मते, यशस्वी जयस्वालला शक्य असेल तेव्हा संधी देण्याची जबाबदारी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची आहे.

याबाबत पुढे बोलताना अश्विन म्हणाला, यशस्वी हा सातत्याने धावा करणारा फलंदाज होता. जर त्याचा आत्मविश्वास कमी होत असेल, तर संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने शक्य असेल तेव्हा त्याला खेळण्याची संधी द्यायला हवी. मात्र, त्याला अजिबात संधी मिळत नाही. ही त्याच्यासाठी अन्यायकारक बाब आहे.

Comments are closed.