परीक्षण- आत्मशोधाचे काव्य
>> डॉ. अदिती काळमेख
कवी शब्दवेडा असतो. मनाच्या गाभ्याला स्पर्शून जाणाऱ्या भावना, तरल संवेदना यांना अर्थवाही करणारे नेमके शब्दरूप गवसले की, आपसूक त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात कविता उमलून येते. कितीही प्रतिभासंपन्न, सिद्धस्त कवी असला तरी मनाच्या सागरात हेलकावणाऱ्या सगळ्याच भावना चिमटीत पकडता कुठे येतात? अव्यक्त असे उरतेच काही. समृद्ध जीवनानुभवाच्या, व्यासंग आणि अनुभूतीच्या बळावर आत्मशोधाच्या वाटेने प्रवासात असताना कधीतरी असे अव्यक्ताचे वादळ कवेत येते, कवितासंग्रहाच्या रूपात संजीवनीताई ते वाचकासमोर ठेवतात आणि वाचकाला एक समृद्ध अनुभव बहाल करतात.
संजीवनीताईंनी आपल्या मनोगतात कवितेला ‘बिंबशरण कला’ म्हटलं आहे. उत्तम कविता दोन प्रकारे रसिक मनाला साद घालत असते. कधी कवीचे शब्द वाचकाला आत्मानुभूती देत असतात किंवा कधी त्याच्या शब्दांचे बोट पकडून न अनुभवलेल्या जगाचे प्रत्ययकारी दर्शन रसिक घेऊन येतो. या कवितासंग्रहातील बहुतेक कविता या वाचकाला दुसऱ्या प्रकारचा अनुभव देतात. ताईंचे गर्भारले शब्द वाचकाच्या मनाला बिलगून एका अनवट वाटेवरून न अनुभवलेल्या जगाची सैर घडवून आणतात.
‘झाडाने जितके सहज सोडून द्यावे पाण्यावर
जाळीदार पान तशी सोडून द्यावी
कविता वाचत्या डोळ्यांच्या
जिवंत झऱ्यात…’
हे कवयित्रीचे शब्द फक्त कवितेपाशीच थांबत नाहीत, ते एकूण जगण्याचेच तत्त्वज्ञान सांगून जातात.
कवितेवर निरतिशय प्रेम करणारे, आतून बाहेरून कवितामय झालेले हे ळवे मन आहे. कविता त्यांचा चिंतन विषय, आस्वाद्य विषय आणि प्रेयसही! सजीवनात मिळालेली समर्थ साथ जसा काव्य विषय बनतो तसा जिव्हारी लागलेला काव्यचोरीचा अनुभवही! त्या निर्गुण निराकार शक्तीला सादही कवितेतून घातली जाते, निरोपखुणाही तिच्या साक्षीनेच व्यक्त होतात आणि पायरीवर देहाचे श्रीफळ वाहिले जात असताना कवितेच्याच हातावर दह्याची कवडी घालायची इच्छा आहे. तिच्या साथीची अदमुरी चव घेऊनच कृतज्ञ भावाने प्रवासास निघण्याची इच्छा कवयित्री व्यक्त करते. हे भरलेपण आणि भारलेपण भलतेच लोभस आहे.
त्यामुळे सहाजिकच कविता बोट कशी पकडते, कवीचा अभिमान, ती वाचावी कशी, तिला स्वतंत्र अस्तित्व कसे असते, तिच्या मागच्या प्रेरणा, अमीट अनुभूती, तिची मानवी जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करण्याची समर्थता हे सारे या संग्रहातील कवितांमधून नेमकेपणाने व्यक्त होते. मला अतिशय आवडलेली कविता म्हणजे ‘वसुदेव… कन्हैया… जमुनामैया’. आपल्या सर्वांना ज्ञात असलेल्या कथेची एका विद्या प्रांगणातील अनुभवाशी त्यांनी घातलेली सांगड केवळ अप्रतिम आहे.
‘संपवून तिचे विहित कर्तव्य
ती बसते खाली तेव्हा
ऐकू येत असतो आवाज
वसुदेवाचा वाजणाऱ्या टाळ्यांतून
कन्हैया पालतिरी
सुखरूप पोहोचला म्हणून…!’
आयुष्याइतका समर्थ गुरू कुणीच नसतो हे व्यक्त करणारी ‘बरे झाले’, तुकोबांशी संवाद साधणारी ‘बीज’, एका गर्द हिरव्या पांदीतून साकारलेल्या जिवंत प्रवासाची अनुभूती पाता पाता कवितेशी जोडणारी ‘पाणंद’. आशयाच्या नेमक्या अभिव्यक्तीला अनुलक्षून काही वेगळे शब्द संजीवनीताईंनी या संग्रहात योजलेले आहेत. उदा. स्पर्शाक्षर, ललितकुसुंबी, हर्षबावरी, तारकसंवेदन, विनष्टी, मरंदप्याले, सकार, क्षमाधवल, महौघ, निके, सोनजांभळा, प्राणविरागी, लाघववचने, अधरखुणा, झावळगाथा, चांदणचकवा.हे शब्द कवितेचे सौंदर्य तर वाढवतातच, वाचकाच्या मनात झिरमिरत राहतात. इहलोकाकडून परलोकाकडे जाणारे हे शब्दलोलूप कविमन आपली प्रगल्भता आणि पाशमुक्त होण्याच्या अनावर असोशीने वाचकाला भावविभोर करते. या कविता एका संयत चिंतनशील अभिव्यक्तीचा एक अक्षर अनुभव देऊन जातात.
‘आपल्या असण्याचा आपल्यालाच एक जालीम चटका देण्याची’ गरज व्यक्त करणाऱ्या या कविता पायरवही न करता वाचकाच्या मनात प्रवेश करतात, आपल्या जगण्यावागण्याचा पुनर्विचार करायला भाग पाडतात.
‘जगण्या-विझण्याच्या दोन टोकांतही
इतकं सहज ललित झुलता येतं
हे आजवर दिसलं कसं नव्हतं मला?’
असं आत्मचिंतन करणारी ही समंजस कविता आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रसिकांसमोर ठेवणाऱ्या कवयित्री संजीवनी बोकील यांचे मनपूर्वक अभिनंदन! या कवितांचे मर्म नेमकेपणाने आपल्या कुंचल्यातून साकारणाऱ्या मुखपृष्ठकार संतोष घोंगडे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. डॉ. वृषाली किन्हाळकर यांची पाठराखणही वाचनीय आहे.
जगण्याच्या प्रवासात वेचलेल्या अनुभव कणांचे कुंभ ज्या निर्मम वृत्तीने संजीवनीताई या संग्रहाच्या निमित्ताने वाचकांच्या अंजलीत रिते करतात, ते टिपता आले तर वाचकाचे जीवन समृद्ध होईल, यात शंका नाही.
अव्यक्ताची वादळे
कवयित्री : संजीवनी बोकील
प्रकाशक: कॉन्ट्रॅक्ट पब्लिकेशन्स
पृष्ठे : 144 मूल्य : 300रुपये
Comments are closed.