हितेंद्र ठाकुरांचं पाऊल ‘ठाण्या’च्या दिशेने, एकनाथ शिंदे काय करणार याकडे लक्ष

ठाणे विधान परिषद : एकीकडे बहुजन विकास आघाडी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय हालचालींमुळे त्याला अधिकच बळ मिळताना दिसत आहे. हितेंद्र ठाकूर हे ठाण्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यात जाऊन ते राजकीय भेटीगाठी घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ठाणे विधान परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत मोठे आणि धक्कादायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. वसई-विरारमध्ये वर्चस्व असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला (BVA) थेट शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव शिंदेंनी ठाकूर पिता-पुत्रांना दिल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

या मोठ्या राजकीय खेळीमुळे शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर हे ठाणे विधान परिषदेचे उमेदवार असू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Hitendra Thakur Thane Visit : हितेंद्र ठाकूर तातडीने ठाण्याच्या दिशेने रवाना

या सर्व घडामोडींदरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे अचानक आपल्या खासगी गाडीने ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ते वैयक्तिक भेटीसाठी कोणाच्या तरी घरी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली, तरी सध्याच्या वातावरणात ते ठाण्यात कोणती मोठी राजकीय भेट घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रहार संघटनेनंतर आता पक्षाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदेंनी बविआला दिलेला हा विलीनीकरणाचा प्रस्ताव राज्याला धक्का देणारा ठरू शकतो.

Ravindra Phatak Meets Thakur : रवींद्र फाटक यांनी घेतली ठाकूर पिता-पुत्रांची भेट

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत इच्छुक आहेत. रवींद्र फाटक यांनी स्वतः वसईत जाऊन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्यानं या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या भेटीनंतर वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा पूर्णपणे शिवसेनेला मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. आगामी काळात मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि ठाण्यावर पूर्ण वर्चस्व राखण्यासाठी शिवसेनेने ही मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

Vasai Virar Corporators Numbers : 71 नगरसेवकांचे संख्याबळ ठरणार गेमचेंजर

बहुजन विकास आघाडीची वसई-विरार महानगरपालिकेत एकहाती सत्ता राहिलेली आहे. बविआकडे सध्या तब्बल 71 नगरसेवकांचे तगडे संख्याबळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे संख्याबळ अत्यंत निर्णायक मानले जाते. जर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा पक्षात विलीनीकरण केले, तर त्याचा थेट आणि सर्वात मोठा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी होणार आहे. अर्थात, या सर्व पेचात अंतिम उमेदवार कोण असेल, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार आहेत.

Vidhan Parishad Seat Demands : शिवसेनेला 4 जागा सुटल्याची माहिती

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीत 6 जागांची आग्रही मागणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, ठाणे आणि जळगावच्या जागांचा समावेश होता. आतापर्यंत महायुतीच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, शिवसेनेला ठाणेनाशिक, यवतमाळ आणि परभणी या 4 जागा सुटल्याची माहिती मिळत आहे. आता ठाण्याच्या हक्काच्या जागेवर एकनाथ शिंदे विलीनीकरणाचा डाव टाकून क्षितिज ठाकूर यांना रिंगणात उतरवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी: 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.