रमेश म्हात्रेचा जामीन स्थगित, शरण येण्याचे आदेश; हायकोर्टाचा दणका
डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन स्थगित करत त्याला उद्या, रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यत पोलिसांना शरण येण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. म्हात्रे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांना शरण आला नाही किंवा फरार झाला तर त्याची मालमत्ता जप्त करा, असे न्यायालयाने प्रशासनाला खडसावले आहे.
हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने म्हात्रेला हा दणका दिला आहे. म्हात्रेसह अन्य तीन आरोपांचा जामीन स्थगित केला जात आहे. तेव्हा डॉक्टरांनी किंमान जनहितासाठी सोमवारी संप करू नये, असे आवाहन न्यायालयाने केले. पुढील आठवड्यात यावर सविस्तर सुनावणी होईल.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना म्हात्रेने मारहाण केली. याप्रकरणी डॉक्टरांनी जाहिर केलेला संप व म्हात्रेला मंजूर झालेल्या जामीनाची स्वतःहून दखल घेत न्यायालयाने याची स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. शनिवारी सुट्टीच्या दिवशी खंडपीठाने यावर सविस्तर सुनावणी घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची संवेदनशीलता लक्षात घेता आम्ही म्हात्रेसह अन्य तीन आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन स्थगित करत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. म्हात्रेची 18 पैकी 17 गुह्यांत निर्दोष सुटका झाली आहे. या सर्व गोष्टींचा दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर करताना विचार केला नाही, असा ठपका खंडपीठाने ठेवला.
Comments are closed.