महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
बीड : मूळ बीड (Beed) जिल्ह्यातील कन्या असलेल्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर, सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत, आपण याप्रकरणी शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. तसेच, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेंवरही खासदार सोनवणेंनी टीका केली.
बीडच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मी फलटणला जाणार, माध्यमांसमोर याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार आहे. कोणता लोकप्रतिनिधी यात होता, न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे सोनवणे यांनी म्हटले. तसेच, मृत महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या महिला आयोगाच्या पत्रकार परिषदेवर देखील सोनवणे यांनी टीका केली.
सोनवणेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा
इतर प्रकरणात चाकणकर ताई प्रेस घेताना दिसल्या नाहीत. त्यांचा चकार शब्द देखील नाही, असे सोनवणे यांनी म्हटलं. तसेच, ही हत्या की आत्महत्या याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आत्महत्या केली असेल तर कोण कारणीभूत आहे? सध्या मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी, मी हॉस्पिटलचे डीन, पोलिस आणि लोकप्रतिनिधी यांना भेटून जाब विचारणार, असेही सोनवणे यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंना यातही राजकारण दिसतं का?
केंद्राच्या यंत्रणेकडे हा तपास द्यावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तिथल्या पोलिसांकडे तपास दिला तर न्याय कधी मिळणार? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. तुम्हाला यात देखील राजकारण करायचे आहे का? तुम्ही गुंड पाळले त्याचा रोख नेमका कुणाकडे होता हे माहित नाही. उलट तुम्हीच जिल्ह्याची बदनामी केली, त्यामुळे त्यांनी असं बोलू नये, असे म्हणत सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर पलटवार केला.
पंकजा मुंडेंना 2 वर्षानंतर आठवण झाली
पंकजा मुंडे यांना बाद झालेल्या मताची दोन वर्षानंतर आठवण आली. राज्यात तुमचे सरकार होते, भाऊ पालकमंत्री होता आणि तुम्ही असं म्हणता. दोन लाख मत बोगस झाले? पण वही होता जो मंजुरे खुदा होता है… त्यांच्याच यंत्रणेवर त्यांचा भरोसा नाही, या गोष्टीचा खेद वाटतो, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी बोगस मत संदर्भाने केलेल्या आरोपावर उत्तर देताना म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.