बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राहुरीत काय घडणार? प्राजक्त तनपुरेंची लढण्याची तयारी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.
बारामतीत सुनेत्रा पवार लढणार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नाही. पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यात विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
राहुरीत प्राजक्त तनपुरे इच्छुक
भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 ला निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती. या जागेवर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.