राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल: विजय वडेट्टीवार

मुंबई : अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेने सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही.

‘बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचं बोलल्यानंतर वडेट्टीवार यांनी हे मोठे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल होणार आहे.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले

..तर बारामतीमध्ये तिहेरी लढत

एकीकडे विजय वडेट्टीवारांनी बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हं आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.

सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्यावं – लक्ष्मण हाके

सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Baramati Assembly By-election)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
  • अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
  • अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
  • मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
  • मतमोजणी : 4 मे 2026
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

आणखी वाचा

Comments are closed.