तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी


पुणे : गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली होती. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना चारचाकी कार आणि ट्रकची धडक होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता तिरुपती दर्शनावरुन येताना पती-पत्नीच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. बारामती शहरातील हे दाम्पत्य तिरुपती (Tirupati) बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते, मात्र दर्शनाहून परत येताना झालेल्या कार अपघातात पती अनिल जगताप यांच्यासह कारमधील आणखी एकाचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत.

बारामतीतील शिवाजी नगर येथील जगताप कुटुंबीय बालाजीच्या देवदर्शनासाठी गेले होते. तिरुपतीवरुन दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे साडेचार वाजता हुबळी राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांच्या चारचाकीची वाहनाची पुढील ट्रकला धडक बसली. त्यामध्ये अनिल जगताप हे जागीच मृत पावले तर वैशाली जगताप या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना हुबळीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक मुलगी जखमी आहे, तिच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगताप कुटुंबीय शनिवारी तिरुपती दर्शनासाठी गेले होते आज परतत असताना पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. एकूण पाच जण गाडीत प्रवास करीत होते, त्यातील दोन जण मृत तर एक मुलगी जखमी झाली आहे. सुदैवाने उर्वरीत दोन जण सुखरूप आहेत. मात्र, या घटनेनं जगताप कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, रस्ते महामार्गावरील अपघाताच्या वारंवार घडणाऱ्या घटना चिंताजनक बाब बनली असून वाहनांचा स्पीड, ओव्हरेटक करण्यासाठी झालेली घाई आणि ड्रँक अँड ड्राईव्ह हे महत्त्वाचं कारण मानलं जातं.

हेही वाचा

अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.