ह्रदयद्रावक… बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर

पुणे : राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. याउलट अपघाताची (Accident) मालिका सुरू असून आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. बारामती (Baramati) तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे सायंकाळी झालेल्या एका अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला नऊ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी (Police) धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय 17) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय 15) या दोन्ही सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय 9) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, मृतांचे शव शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

रायगडाहून परतताना शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड येथे आलेल्या सातारा जिल्ह्याच्या केंजळेवाडी गावातील कपिल केंजळे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कपिल केंजळे हा किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम झाल्यानंतर पोलादपूर मार्गे आपल्या घरी साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. मात्र, दुर्दैवाने त्याचा वाटेतच अपघात झाला, अपघातात कपिलला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, पोलादपूर पोलिसांनी त्याला उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली. या दुर्घटनेमुळे शिवभक्तांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट

Comments are closed.