क्रीडानगरीतून – बीसीसीआयमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये ‘क्रीडा विज्ञान आणि वैद्यक प्रमुख’ या पदासाठी अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारावर बीसीसीआयच्या एलिट क्रिकेट आणि सीओई कार्यक्रमांतर्गत क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय सेवांना धोरणात्मक आणि कार्यात्मक नेतृत्व प्रदान करण्याची जबाबदारी असेल. या भूमिकेमध्ये हेड ऑफ फिजिओथेरपी (सीओई), टीम इंडियाचे हेड ऑफ फिजिओथेरपी, हेड ऑफ एस ऍण्ड सी (सीओई) व्यवस्थापनाचाही समावेश असेल. हिंदुस्थानी खेळाडूंसाठी एक एकात्मिक सहाय्य कार्यक्रम प्रदान करण्यासाठी ते राष्ट्रीय आणि सीओई प्रशिक्षक, क्रिकेट शिक्षण आणि इतर कामगिरी तज्ञांसोबत मिळून काम करतील.
दिल्लीपासून जपानपर्यंत हिंदुस्थानचा धडाका
अफगाणिस्तान विरुद्धची टी-20 मालिका 13, 15 आणि 17 सप्टेंबरला दिल्ली येथे होणार आहे. त्यानंतर हाच हिंदुस्थानी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होईल. हिंदुस्थानची मोहीम 28 सप्टेंबरला उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू होणार असून उपांत्य फेरी 1 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे.
वैभव सूर्यवंशीचे पदार्पण हुकण्याची शक्यता
हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. वैभव सूर्यवंशीदेखील या मालिकेत खेळणार असून तो आपल्याच देशात देशासाठी पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. पण या सामन्याच्या दिवशी पावसाचीही शक्यता आहे. हा सामना वैभवचा हिंदुस्थानातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. ही त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पण त्याच्या पदार्पणासाठीची प्रतीक्षा लांबण्याची शक्यता आहे. ऍक्यूवेदरच्या वृत्तानुसार 13 सप्टेंबरला हिंदुस्थानच्या राजधानीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुलाबरोबर खेळण्याची इम्रानची इच्छा
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू इम्रान ताहीरने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये पाच विकेट्स घेत विश्वविक्रम रचला आहे. टी-20 सामन्यात पाच विकेट घेणारा तो सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहे. हा टप्पा गाठल्यानंतर तो म्हणाला की, त्याचा मुलगा त्याला खेळत राहण्याची प्रेरणा देतो. त्याने पुढे असेही सांगितले की, त्याच्या मुलाला एक दिवस त्याच्यासोबत क्रिकेट खेळायचे आहे. गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा कर्णधार इम्रान ताहीरने सेंट लुसिया किंग्सविरुद्ध 17 धावांत 5 विकेट घेतल्या. ताहीरच्या शानदार गोलंदाजीमुळे गयानाने सेंट लुसियाला 119 धावांवर रोखले आणि 4 विकेट राखून 122 धावा करत सामना जिंकला. पाच विकेट घेणाऱया ताहीरला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
पीसीबीने खेळाडूंचा अपमान केला
लॉर्ड्स कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून दूर केले. त्याचबरोबर इमाम-उल-हक व मोहम्मद रिझवान यांच्यासह सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याच्या पीसीबीने निर्णय घेतला होता. या निर्णयावर माजी फिरकीपटू सईद अजमलने तीव्र आक्षेप घेतला. अजमल म्हणाला, ‘इतरांपेक्षा बोर्डानेच खेळाडूंचे सर्वाधिक मनोधैर्य खच्चीकरण केले आहे. बोर्ड कोणत्याही खेळाडूला टिकू देत नाही. संघात असे खेळाडू आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली, पण त्यांनाही संघातून वगळण्यात आले आहे.
Comments are closed.