इंग्लंडविरुद्ध गोलंदाजाने भन्नाट फलंदाजी करत पाकिस्तानची राखली लाज! वर्ल्ड रेकॉर्डची केली बरोबरी

पाकिस्तान संघाचा इंग्लंड दौरा दिवसेंदिवस निराशाजनक ठरत आहे, मात्र त्यांच्या एका गोलंदाजाने एका विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजी नाही, तर फलंदाजीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याने सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

एजबस्टन, बर्मिंगहॅम येथे 9 सप्टेंबरपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज रझाउल्ला याने सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

रझाउल्लाने आपल्या कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक नऊ षटकार मारले आहेत. कसोटी पदार्पणाच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या टिम साउथीच्या नावावर आहे. त्यानेही नऊ षटकार मारले होते. त्याने ही कामगिरी 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. आता त्याच्याबरोबरीला रझाउल्ला आला आहे.

कसोटी पदार्पणाच्या एका डावात सर्वाधिक षटकार
9 – टिम साउदी (न्यूझीलंड) वि. इंग्लंड, नेपियर, 2008
9 – रझाउल्ला (पाकिस्तान) वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, 2026
7 – काईल मेयर्स (वेस्ट इंडिज) वि. बांगलादेश, चट्टोग्राम, 2021

सर्वाधिक षटकारांबरोबर रझाउल्ला कसोटी पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पाकिस्तानी खेळाडूही ठरला. त्याने 43 चेंडूंतच 50 धावांचा टप्पा गाठला. त्याने ही कामगिरी करताना 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध 52 चेंडूंमध्ये अर्धशतक केलेल्या फहीम अश्रफला मागे टाकले आहे.

कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 9 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावणारा रझाउल्ला हा पाकिस्तानचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ही कामगिरी 1982 मध्ये कराची येथे श्रीलंकेविरुद्ध रशीद खानने (59 धावा) केली होती.

तसेच पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात रझाउल्ला 63 चेंडूंत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या सहाय्याने 81 धावा करत बाद झाला. यामुळे तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 9 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आला. या यादीत पहिल्या स्थानी बांगलादेशचा अबुल हसन आहे. त्याने 2012 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 113 धावांची खेळी केली होती.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 9व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना नोंदवलेली सर्वोच्च धावसंख्या
113 – अबुल हसन (बांगलादेश) वि. वेस्ट इंडिज, खुलना, 2012
104 – रेजी डफ (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड, मेलबर्न, 1902
98 – ॲश्टन अगर (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2013
81*- कॉर्बिन बॉश (दक्षिण आफ्रिका) वि. पाकिस्तान, सेंच्युरियन, 2025
81 – रझाउल्ला (पाकिस्तान) वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, 2026*

सामन्याची स्थिती
या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे, मात्र पाकिस्तानने तिसऱ्या सामन्यात जोरदार प्रतिकार केला आहे.

तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. पाकिस्तानचा पहिला डाव 133 धावसंख्येवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 453 धावसंख्येचा डोंगर उभारला. पाकिस्तानने दुसऱ्या डावात 449 धावा केल्या आहेत. यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी केवळ 130 धावांचे लक्ष्य आहे. यावरून पाकिस्तान तिसरा सामनाही गमावण्याची शक्यता आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे. (ENG vs PAK 3rd Test Razaullah’s fearless batting equaled world record of most sixes in an innings on test debut)

Comments are closed.