मस्साजोगच्या ‘सरपंच’ पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या निधनानंत रिक्त झालेल्या येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीला आता वेग आला असून आजपर्यंत एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल केलेल्यांमध्ये संतोष देशमुख यांच्य पत्नी अश्विनी देशमुख यांनी सर्वप्रथम अर्ज दाखला होता. येथील सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, 7 एप्रिलपासून आज 13 एप्रिल पर्यंत एकूण पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे, ही निवडणूक (Election) बिनविरोध होणार की नाही, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मस्साजोगमधील सरपंचपदासाठीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर, अश्विनी देशमुख यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. मात्र, गत निवडणुकीत सरपंचपदासाठी अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणुकीत एंट्री केली आहे, त्यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केलाय. तर, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संजीवनी देशमुख यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. तसेच, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख यांचाही अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे, येथे एकूण 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे, येथील निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
आता, या अर्जांची छाननी 15 तारखेला होणार असून 17 एप्रिल रोजी उमदेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की तिरंगी लढत होणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, अद्यापही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बीडमधील काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे. यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं म्हटलं होतं. तर, खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील कालच माध्यमांशी बोलताना ही निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले आहे. मात्र, स्वरुपानंद देशमुख यांनी निवडणू अर्ज भरल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी लढविण्याचा निर्धार केल्याचं दिसून येत आहे.
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहवं – देशमुख
सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरपंच पदावरुन संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसे भेटेल हेच त्यांनी पाहिलं पाहिजे, असा सल्लाच स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना दिलाय. दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईसाठी आजही गाव पाठीशी आहे आणि उद्याही राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं.
हेही वाचा
ह्रदयद्रावक… कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
आणखी वाचा
Comments are closed.