वाल्मिकला झटका, बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज केला होता. न्यायालयातील या अर्जावर आज सुनावणी झाली असून बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, देशमुख कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून वाल्मिक कराडसह (Walmik karad) आरोपींवर आता खंडणीसह खूनाचही खटला चालू राहणार आहे. न्यायालयाच्या (Court) या निर्णयाचे वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, एसआयटीने केलेल्या तपासामुळे हाच निर्णय अपेक्षित होता, असेही त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत गत सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत विरोध केला होता. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता, त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. आता, न्यायालयाच्या निर्णयावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीने जो तपास केला, त्यात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज दाखल झाल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा केविलवाला प्रयत्न असल्याचे म्हटले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज देखील इतर आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत. या लढाईचा शेवट आरोपींना फाशी झाली पाहिजे, असंच आमचे मत असल्याचं देशमुख यांनी म्हटले. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालानंतर उज्ज्वल निकम यांची मस्साजोग ग्रामस्थांनी भेट घेतली आणि या पुढील लढा तुम्हीच लढा अशी विनंती देखील करण्यात आली.
दरम्यान, या घटनेतील फरार कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांनी शोकांतिका व्यक्त करत तो कुठे आहे? त्याचा तपास होत नाही हे तपास यंत्रणेचे अपयश आहे, असे म्हटले. कृष्णा आंधळेंना शोधून अटक करा अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.