महादेव मुंडे हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट, दोन संशयीतांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग
महादेव मुंडे खून प्रकरण बातम्या : बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईतील ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळेत आज दोन संशयीतांच्या नार्को टेस्ट पूर्ण झाली आहे. तीन तासापेक्षा अधिक वेळ संशयीतांच्या नार्को टेस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.
या नार्को टेस्टच्या अहवालानंतरच या प्रकरणी एसआयटीची कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे. आता या नार्को टेस्टचा अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणी आधीच काल एका संशयीताची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली आहे.
एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. 150 हून अधिक संशयित आणि 500 हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासाची चक्रे फिरली आहेत.
नेमकं प्रकरण काय? (Mahadev Munde Death Case)
20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचापरळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, दावा बाळा बांगर यांनी केला होता.
प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक
दरम्यान, प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) काम करत आहे. या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचे जवळपास तीन वेळा जबाब नोंदवण्यात आले. ऑक्टोबर, जुलै आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत त्यांनी एसआयटीसमोर तसेच कॅमेऱ्यासमोर जबाब दिला आहे. या जबाबांमध्ये त्याने वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव अनेकदा घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता वाल्मीक कराडच्या मुलापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.