दारूसाठी पैसे न दिल्यानं तरुणाच्या अंगाला चटके, अमानुष मारहाण; बीडमधील आष्टीत धक्कादायक प्रकार
बीड गुन्हा: बीडमधून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असून खून, अत्याचार, मारहाणीच्या घटनांनी बीडमध्ये कायदा अन् सुरक्षितता उरलीय की नाही असा सवाल सातत्यानं उपस्थित होत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका युवकाला अमानुष मारहाण करत त्याच्या अंगावर चटके दिल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना आष्टी तालुक्यातील वाघळुज गावात घडली. संतोष राठोड असं या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तिघेजण संतोषकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होते. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून आरोपींनी संतोषला पकडून बेदम मारहाण केली. मारहाण करत असताना त्यांनी त्याच्या अंगावर चटकेही दिले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतोष राठोड याने अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. अद्याप आरोपी फरार असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
गावात भीतीचं वातावरण
ही घटना समोर आल्यानंतर वाघळुज गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. केवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे इतक्या अमानुष पद्धतीने मारहाण होणं, हे खरोखरच संतापजनक आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत असून जखमी संतोष राठोडवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता तपासाला वेग दिला आहे.
प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं, बीड पोलीसांची चक्रे फिरली
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे प्रेमसंबंधातून घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात मुलीचे वडील, भाऊ आणि चुलते अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेनंतर शिवमच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पाऊण तास मृतदेह गेवराई पोलीस ठाण्याबाहेर ठेवून ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर तपासाला गती मिळाली आणि तिघांना अटक करण्यात आली.
आणखी वाचा
Comments are closed.