बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा ड्रामा; देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंकडून माझ्यावर दोन राऊंड फायर
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी त्यांच्या साडूच्या भावाला पिस्टल लावून धमकावल्याप्रकरणी बीड (Beed) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. तर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर धनंजय देशमुखांचा पारा चांगलाच तापला. त्यामुळे रविवारच्या दिवशी दिवसभरात ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) माझ्यावर गोळीबार केल्याची तक्रार आणि आरोप धनंजय देशमुखांनी केला. त्यामुळे, या प्रकरणात पोलिसांची कसरत पाहायला मिळाली.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचा साडू दादा खिंडकर न्यायाच्या मागणीसाठी सोबत राहिला. याच दरम्यान दादा खिंडकरने काही तरुणांना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आले आणि या प्रकरणात दादा खिंडकर जेलमध्ये गेला. जामिनावर सुटल्यानंतर दादा खिंडकर आणि त्याचा भाऊ समाधान खिंडकर या सख्खा भावांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, समाधान खिंडकरकडून धनंजय देशमुख यांना देखील लक्ष करण्यात आले. समाधान खिंडकरने घरी घेऊन शिवीगाळ करत धमकावल्याची तक्रार दादा खिंडकरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. मात्र, सख्या भावाचे आरोप समाधान खिंडकरने फेटाळून लावले..
या दोन सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या वादात धनंजय देशमुखांची एन्ट्री झाली. अंतरवाली सराटीहून परतताना धनंजय देशमुख आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवणाकरिता एका हॉटेलवर थांबले होते. त्याचवेळी समाधान खिंडकर देखील योगायोगाने याच हॉटेलवर थांबला होता. यावेळी धनंजय देशमुखाने अंगरक्षकाजवळील बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात समाधानने गुन्हा दाखल केला. दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणात धनंजय देशमुख यांचा पारा चांगलाच चढला अन् त्यांनी थेट ग्रामीण पोलीस ठाणे गाठत पोलिसांना जाब विचारला. थेट धनंजय मुंडेंनी माझ्यावर बंदुकीचे दोन राऊंड फायर केले असा आरोप देशमुखांनी माध्यमांसमोर केला. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धनंजय देशमुखांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन दिलेल्या तक्रारीमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले.
पोलिसांची माहिती, दोन्ही गुन्हे खोटे
धनंजय देशमुख देत असलेल्या तक्रारी वेळीच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उप अधीक्षक व्यंकटराम यांनी सदरील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल पाच तास पोलिस ठाण्यात थांबून त्यांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर धनंजय देशमुख यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात परस्परविरोधी तक्रारी आहेत. या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून न आल्यानं गुन्हे खोटे असल्याचं पोलीस विभागाने प्रेस नोट काढून स्पष्ट केलं. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या तक्रारीचा सविस्तर अहवाल पोलिसांकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे.
मुंडेंची बदनामी झाली, पोलिसांना खुलासा करावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, धनंजय देशमुख यांनी केलेली तक्रार हास्यास्पद आहे. या भांडणात आमचे नेते धनंजय मुंडे यांची बदनामी झाली आणि याचा खुलासा 24 तासात पोलीस विभागाने द्यावा. याकरिता मुंडेंच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून मागण्याचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले. याबाबतची तक्रार धनंजय देशमुख यांनी दिली असेल तर त्याचा खुलासा पोलीस विभागाने करावा असे म्हणणे मुंडे समर्थक भागवत तावरे यांनी मांडले आहे.
दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दीड वर्ष होतायत. सदरील प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. परंतु याचे पडसाद आजही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाहायला मिळत आहे. याच प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर व्हावे लागले. तर धनंजय देशमुख यांना गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.. दरम्यान या निमित्त पहिल्यांदाच धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडेंचे नाव घेत आरोप केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंकडून या आरोपाला काही प्रत्युत्तर मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.