Beed News – पाडाला आंबा लागेना; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा ‘फळांचा राजा’ भाव खाणार
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असून, या दिवशी पूर्वजांची पूजा करून त्यांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आंबा खाण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, ऐन सणासुदीच्या काळात आंब्याची आवक घटली आहे. बदलत्या वातावरणामुळे आंबा अद्याप पाडाला लागलेला नाही, परिणामी बाजारात आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
यंदा मे महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे निसर्गचक्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सहा महिन्यांच्या दीर्घ पावसाळ्याचा आणि वातावरणातील बदलांचा थेट परिणाम आंबा पिकावर दिसून येत आहे. सामान्यतः मार्च महिन्याची चाहूल लागताच आंब्याची आवक सुरू होते आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारपेठा आंब्यांनी ओसंडून वाहतात. परंतु, यंदा आंबा पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावली असून हे पीक तब्बल १५ ते २० दिवस उशिरा येत आहे.
बीड जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी सध्या केवळ पाच टक्केच आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने आंब्याचे दर प्रति किलो २५० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, बाजारात जो थोडाफार आंबा दिसत आहे, तो नैसर्गिकरित्या पिकलेला नसून त्यावर कृत्रिम प्रक्रिया केलेली असण्याची शक्यता आहे, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे यंदाची अक्षय तृतीया गोड करण्यासाठी खवय्यांना खिसा रिकामा करावा लागणार असून, बहुतांश घरांमध्ये हा सण आंब्याविनाच साजरा होण्याची चिन्हे आहेत.
Comments are closed.