बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि विविध घटना लक्षवेधी ठरत आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीडसह राज्यभरात तीव्र संतापाची लाट पसरली. याप्रकरणी, सीआयडी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, आमदार धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच प्रमुख आरोपी, व घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी आपल्या दोषारोपपत्रात लिहिले आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला असून अद्यापही अनेक नवे कारनामे समोर येत आहेत. वाल्मिक कराडनंतर बीडमधील खोक्याभाई व आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतिश भोसलेला अटक करण्यात आली आहे. त्यासह जिल्ह्यात विविध गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच, आज बीडमधील एका शिक्षकाने (Teacher) गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोटवरुन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बीड शहरातील स्वराज नगर भागात सकाळच्या सुमारास कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बाहेर एका व्यक्तीने एसीच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचे नाव असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेवर ते शिक्षक होते. या आश्रम शाळेतील नोकरीशी संबंधित कारणावरुन त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या सुरू असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, कोळगाव येथील आश्रम शाळेसाठी 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक अडचणी आल्या, असे कारण सध्या सांगितले जात आहे. नागरगोजे यांनी काल फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करत असल्याचं सांगितले होते. त्यात काही व्यक्तींची नावे देखील नोंदवले होते. आता, यावरूनच पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
बीडमध्ये पोलीस कारवाईला वेग
दरम्यान, बीड पोलिसांनी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळे फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. दुसरीकडे सतिश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरावरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे. त्यामुळे, खोक्यावर देखील पोलिसांच्या गुन्हेगारी कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. विशेष म्हणजे खोक्याला बीड जिल्ह्यातून तडीपार केल्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे.
हेही वाचा
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
अधिक पाहा..
Comments are closed.