मोठी बातमी! वाल्मिक कराडला सुट्टी नाही; सरपंच हत्याप्रकरणी बीड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. कारण, बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. या दरम्यान न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik karad) जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर बीडसह राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळाली. विधिमंडळातही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर, बीडमधील नेते आणि आमदार धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध कशाप्रकारे नाही, असा युक्तिवाद मागील सुनावणीत कराडच्या वकिलांच्या माध्यमातून तब्बल तीन तास करण्यात आला होता. तसेच, या प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. त्यावर निर्णय देत आज न्यायालयाने हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला. त्यामुळे आता कराडच्या वकिलांकडून पुढे काय पावलं उचलली जातात? याकडेच लक्ष लागले आहे. वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हा दाखल असल्याने कराडचा अर्ज फेटाळत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. दरम्यान, वाल्मिक कराडसह 5 आरोपींना पोलिसांनी सरपंच देशमुख हत्याप्रकरणात अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे. पोलिसांकडून त्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात येते.
दोषमुक्ती अर्जावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींचे जामीन आणि दोषमुक्ती अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात झालेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला. तर काही अर्जांबाबत मूळ फिर्यादीचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या खटल्यातील महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाबाबत निर्णय देत जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर, काही आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावरील सुनावणी 10 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा हा खटला चर्चेत आला असून, पुढील तारखेला होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.