न्यायव्यवस्थेकडून एकाच समुदायाला लाभ
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून आक्षेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून होणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या आणि नियुक्त्या यांच्यासंदर्भात माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये एकाच समाजघटकाला प्राधान्य मिळताना दिसत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या विरोधात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्र पाठवून आपल्या आक्षेप त्यांना कळविल्याची माहिती देण्यात आली.
न्यायवृंदाच्या कृतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि महिला यांना फारसे स्थान मिळताना दिसत नाही. एकाच समाजघटकाला लाभ मिळताना दिसतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेत समाजाच्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान मोदी यांनाही प्रत
आपल्या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनाही माजी सरन्यायाधीश गवई यांनी पाठविली आहे. या परिस्थितीमुळे घटनात्मक उत्तरदायित्वाची संकल्पना मागे पडत आहे. न्यायव्यवस्थेत समाजाच्या सर्व घटकांना उचित स्थान मिळणे आवश्यक आहे. हेच घटनेला अपेक्षित आहे. त्यामुळे अशी स्थिती ठेवली जाऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कोणत्याही समाजाला नाही विरोध
कोणत्याही एका समाजाच्या मी विरोधात आहे, असा या पत्राचा अर्थ काढला जाऊ नये. मी कधीही कोणत्याही समाजाच्या विरोधात राहिलेलो नाही. उच्चवर्णिय समाजासंबंधी माझी भावना स्वच्छ आहे. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता असा समज दृढ होत आहे, की न्यायव्यवस्थेत एकाच समाजाला प्राधान्य देण्यात येत आहे. ही स्थिती योग्य नसून सर्व समाजांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे. ज्यावेळी मी सरन्यायाधीश आणि न्यायवृंदाचा भाग होतो, तेव्हा मी नेहमीच सर्व समाजघटकांना न्यायव्यवस्थेत समतोल स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या काळात तसे होताना दिसत नाही, असे म्हणणे गवई यांनी मांडले आहे.
बदल्यांमध्येही पक्षपाताचा आरोप
उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्या करताना किंवा त्यांची नियुक्ती विशिष्ट उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश म्हणून करतानाही एकाच समाजघटकाला प्राधान्य दिले जात आहे, असे दिसून येत आहे. यामुळे एकाच समाजाचे प्रतिनिधित्व न्यायव्यवस्थेत वाढत असून यामुळे समतोल राहिलेला नाही. ही स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
Comments are closed.