सायबर भामट्यांपासून सावधान! पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सध्याच्या डिजिटल व इंटरनेटच्या युगात प्रत्येकजण मोबाईल आणि ऑनलाईन सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असून नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एका विशेष संदेशाद्वारे दिला आहे.

फसवणुकीच्या नवनवीन क्लृप्त्या आणि सायबर गुन्हेगारांचे प्रकार सायबर भामटे विविध मार्गांनी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आयुष्यभराची कमाई एका क्लिकवर लंपास करत असल्याचे त्यांनी नमूद केले:

डिजिटल अरेस्ट  ची भीती: स्वतःला सीबीआय,कस्टम्स किंवा पोलीस अधिकारी भासवून लोकांवर गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन पैसे उकळणे.

बँकेच्या नावाखाली गंडा: बँक खाते बंद होण्याची भीती दाखवून किंवा केवायसी  च्या नावाखाली ओटीपी  व गोपनीय माहिती मागवून खात्यातील रक्कम पळवणे.

गॅस वा वीज बिल थकल्याचे बनावट संदेश: ‘महानगर गॅस कनेक्शन बंद होणार’ असे खोटे मेसेज पाठवून बनावट लिंक किंवा ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडणे. घरबसल्या नोकरी किंवा कॅप्चा भरून मोठी कमाई करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणे.

मिशन रायझिंग फ्लॉवर्स’द्वारे जनजागृती

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’   हे विशेष अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थ विरोधी जनजागृती व स्वसंरक्षणाचे धडे मोठ्या प्रमाणावर दिले जात आहेत.

Comments are closed.