५५ रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी प्रसाद कर्वेंचे आमरण उपोषण सुरू
दापोली नगरपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या ५५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी शुक्रवार, २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीपासून दापोली नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दापोली नगरपंचायतीच्या विविध विभागांमध्ये हे ५५ कर्मचारी अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर सेवा बजावत आहेत. नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही त्यांना अद्याप कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतनही अनेकदा वेळेवर होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थैर्य मिळावे आणि त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रसाद कर्वे यांनी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
५५ कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने नगरपंचायत प्रशासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.