किकवी डेअरी प्लांट खरेदीत 50 कोटी व्यवहाराची ईडीकडून चौकशी करा; तूर्त गोकुळ दूध निवडणूक स्थगित करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दैनंदिन चार लाख लिटर दूध हाताळणी क्षमतेचा डेअरी प्लांट खरेदी करण्यासाठी सहकार कायद्यातील नियम धाब्यावर बसवून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या संचालक मंडळाने पुण्यातील अनंत दूध किकवी कंपनीचा डेअरी प्लांट खरेदी करताना ५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या संशयास्पद व्यवहाराची सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर या व्यवहारात तत्कालीन संचालक अडकले असल्याने सध्या सुरू असलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक तात्काळ स्थगित करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, अवधूत साळोखे, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, महेश उत्तुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध संघाने पुणे जिल्ह्यातील भोर मधील अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड किकवी कडील मालमत्ता खरेदी करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. एकूण ८२ कोटी ६ लाखांची ही मालमत्ता खरेदी करताना सहकार कायद्यातील नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे.मालमत्तेच्या खरेदी खताची नोंदणी, मूल्यांकन शुल्क, नोंदणी फी, जीएसटी यासाठी १३ कोटींच्या वित्तीय व प्रशासकीय खर्चाला संचालकांद्वारे मंजुरी देण्यात आली होती.पण या पैशांचा विनियोग कोणत्या कारणासाठी केला हे स्पष्ट होत नाही.तसेच खरेदी-विक्री बाबतचा सर्च रिपोर्ट उपलब्ध नसल्याचा शेरा सहायक निबंध सहकारी संस्था (दुग्ध) यांनी दिला आहे, किकवी येथील मालमत्ता खरेदी करताना आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचा चौकशी अहवाल तत्कालीन सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिल्यामुळे या व्यवहारात प्रचंड अनियमितता झाल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप करत या ५० कोटींच्या भ्रष्टाचाराची ईडी कडून चौकशी करा, अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी यावेळी केली.

माजी संचालिका शौमिका महाडिक गप्प का?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना गोकुळवर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ महायुती सोबत तर आमदार पाटील महाविकास आघाडीकडे राहिले, या पाच वर्षात विरोधी बाकावर असलेल्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळमधील कारभाराबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन संचालक मंडळांकडून खुलासा करण्याची मागणी लावून धरली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायचे बंद केले. पुण्यातील अनंत दूध किकवी कंपनीचा डेअरी प्लांट खरेदी करताना इतका मोठा गैरव्यवहार होऊनही संचालिका महाडिक गप्प का आहेत? असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

गोकुळचा पै आणि पै दूध उत्पादकांच्या मालकीचा…

दररोज गाई-म्हशींची सेवा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या मालकीचा गोकुळ दूध संघ आहे. तुम्ही संचालक होऊन दूध उत्पादकांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारला आहे. यामुळे आता होऊ घातलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक तुम्हाला लढवण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारने तत्काळ यात हस्तक्षेप करून या निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी केली.

Comments are closed.