धक्कादायक! EVM मशिनवर उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

भंडारा: राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे (Election) निकाल हाती आले असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे, नगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून आचारसंहिता देखील संपुष्टात आली आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासनावर आता निवडणुकांची जबाबदारी आली आहे. एकीकडे निवडणुकांचं कामकाज सुरू असताना दुसरीकडे नगरपालिका निवडणुकांवेळी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे भंडारा (Bhandara) नगरपालिका मतदान केंद्र संदर्भात 7 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराचं नावं नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मतदान केंद्र प्रमुखासह 7 कर्मचाऱ्यांना काल तडकाफडकी निलंबित केलं. या कारवाईनंतर आता जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा प्रांत अधिकारी माधुरी तिखे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (भंडारा नगर पालिका मुख्याधिकारी) जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ईव्हीएम मशिनवर उमेदवाराचे नाव झाकले

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनसाठी असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये 5 उमेदवार आणि एक नोटा असे 6 पर्याय असणे आवश्यक होते. मात्र, मतदान केंद्र अधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र तयार करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करुणा राऊत यांच्या नावासह नोटा हा पर्याय झाकल्या गेला. त्यामुळे प्रत्यक्षात ईव्हीएम मशीनवर 4 उमेदवारांची नावं असल्यानं त्यांनाच मत मिळाली. यात करुणा राऊत यांचं नावं नसल्यानं त्यांना मत मिळाली नसल्याचा आरोप करुणा राऊत यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आणि ईव्हीएम मशीन तपासणी केल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखासह तेथील 7 कर्मचारी आणि ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी तिखे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

आणखी वाचा

Comments are closed.