भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, ‘फ्लाय ॲश’चा वापर केल्याचा खळ

भंडारा न्यूज : विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची कंत्राटदार आणि प्रशासन मिळून कशी उधळपट्टी करतात, याचा धक्कादायक नमुना भंडाऱ्याच्या (Bhandara) लाखांदूर तालुक्यात समोर आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क ‘फ्लाय ॲश’ (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Bhandara News: नेमके प्रकरण काय?

लाखांदूर तालुक्यात सध्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत:
कराडला ते ढोलसर, मांडळ ते बोथली, मांडळ ते सरांडी या तिन्ही रस्त्यांसाठी शासनाने 334 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. मात्र, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून कंत्राटदार केवळ स्वतःचा खिसा भरण्यात मग्न असल्याचा दावा स्थानिक नागरिकांसह राजकीय नेत्यांनी केला आहे.

Bhandara News: शिवसेनेचा (ठाकरे गट) आक्रमक पवित्रा

या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या प्रशासनाविरुद्ध ‘शड्डू’ ठोकला आहे. ढोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी राखेचा वापर होत असल्याचे आणि दर्जेदार गिट्टीऐवजी वाळू मिश्रित चुरा वापरला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या कामाचा रीतसर पंचनामा करत कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Bhandara News: प्रशासनाची प्रतिक्रिया

या गंभीर आरोपांनंतर एबीपी माझाशी बोलताना उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांनी म्हटले की, रस्ता बांधकामाच्या कामात कुठलीही अनियमितता नसून अंदाजपत्रका नुसारच काम योग्य पद्धतीनं होत आहे. रस्ता बांधकामासाठी जो डब्ल्यूएमएम थर गरजेचा आहे त्यानुसार काम ग्रेडेशन नुसार सुरू आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच रस्ता बांधकाम असल्यानं राज्य गुणवत्ता निरीक्षक हे राज्यातील कुठूनही येतात, रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता तपासतात आणि हे तपासणी करत असताना अंदाजपत्रकानुसार लेयरनुसार तपासणी करत असल्यान त्यात कुठलाही अपहार होऊ नये, या दृष्टीनं आम्ही त्यावर नियंत्रण ठेवून आहोत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फ्लॅशची राख होती. मात्र, ती कंत्राटदारानं स्वतःच्या कुठल्यातरी कामासाठी आणली असावी, असं मोघम उत्तर त्यांनी दिलंय.

Bhandara News: शासन काय कारवाई करणार?

दरम्यान, 34 कोटींच्या या ‘राख’ झालेल्या कामावर शासन काय कारवाई करणार? निकृष्ट काम करणाऱ्या त्या कंत्राटदाराला पाठीशी घातले जाणार की त्याच्यावर कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश

आणखी वाचा

Comments are closed.