भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या अमानुष आणि थरारक हल्ला प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या टवाळखोर आरोपींना न्यायालयाने 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा धावत्या गाडीला लटकून हल्ला करण्याचा आणि महामार्गावर पडल्याचा थरारक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला.
Public Prosecutor Argument : सरकारी वकिलांचा युक्तिवाद
न्यायालयात सरकारी पक्षाने आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. पोलिसांनी सुरुवातीला केवळ चौकशीसाठी आरोपींना ताब्यात घेतले होते, ती अधिकृत अटक नव्हती. घटना घडलेल्या दुर्गम भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य होत नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला.
पीडित कुटुंबातील तरुणीची छेड काढून टवाळखोरांनी शिट्ट्या मारल्या. त्याला विरोध केला असता संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंब गाडीतून पळून जात असताना आरोपींनी रस्त्यात तब्बल 6 ठिकाणी गाडी अडवून तोडफोड केली आणि प्रचंड दहशत माजवली. पर्यटकांची चोरीला गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारे जप्त करणे बाकी आहे.
टक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवणे गरजेचे आहे. तसेच पर्यटकांना शिट्ट्या मारणारे मुख्य टवाळखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
Accused Lawyer Argument : आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत न्यायालयात युक्तिवाद केला. फिर्यादीने तक्रारीत 30 किलोमीटर पाठलाग करून मारहाण झाल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे टोल नाक्यापर्यंतच घटना घडल्याचे सांगितले आहे. यात मोठी विसंगती आहे.
फिर्यादी कुटुंबानेही तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आणि लोकांना मारहाण केली आहे. पोलिसांना मूळ आरोपी कोण आहेत हे ठाऊक नसून त्यांनी कोणालाही संशयावरून उचलून आणले आहे. पोलिसांनी लावलेले जीवघेण्या हल्ल्याचे कलम चुकीचे असून तिथे तशी कोणतीही गंभीर घटना घडलेली नाही. दोन आरोपींना परवा रात्री अडीच वाजता अटक केली होती, तर 24 तासांच्या आत त्यांना न्यायालयात हजर करणे बंधनकारक होते. यासाठी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला.
मात्र, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपास पूर्ण करण्यासाठी आरोपींची 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
What Bhavali Dam Case : नेमके प्रकरण काय?
नाशिकच्या इगतपुरीतील भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील तरूणीची टवाळखोरांनी छेड काढली होती. त्यावर कुटुंबीयांनी जाब विचारल्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक टोळक्याने पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करत लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.
या थरारक हल्ल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित कुटुंब नाशिक–मुंबई-आग्रा महामार्गाने जिवाच्या आकांताने पळत असताना, एका हल्लेखोराने त्यांच्या चालत्या कारच्या दरवाजाला लटकून गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर गाडीचा वेग वाढल्याने तो थेट हायवेवर धाडकन कोसळला. हा थरार रस्त्यावरील काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला होता.
पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे, तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींपैकी एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.