भाईंदर अप्पर तहसीलदार कार्यालयाला भीषण आग, वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉलच्या पाठीमागे असलेल्या तहसीलदार कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांची एकच पळापळ उडाली. अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे कार्यालयातील महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज वाचविण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.

मंगळवारी रात्री ९.५० वाजता तहसीलदार कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन जवानांनी तीन बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एका अग्निशमन वाहनामार्फत ५० फूट लांबीच्या दोन होज पाइपची एक लाइन आणि १०० फूट लांबीच्या होज पाइपची दुसरी लाइन टाकून पाण्याचा मारा करण्यात आला.

जिन्याजवळील रद्दी खाक

आगीत कार्यालयाच्या मागील बाजूच्या जिन्याजवळ ठेवलेले जुने अडगळीचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणातील रद्दी कागद जळून खाक झाले. मात्र आगीची तीव्रता अधिक असतानाही अग्निशमन जवानांनी कार्यालयातील मुख्य भागाचे संरक्षण केले. त्यामुळे महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज सुरक्षित वाचविण्यात आले. तहसीलदार नीलेश गौड यांनीही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती दिली.

Comments are closed.