दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी कोण?
ठाणे: चंद्रपूरनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या भिवंडी महापालिकेत (Bhiwandi) अखेर महापौरपदाची निवड झाली असून सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार नारायण चौधरी हे महापौर बनले आहेत. महापालिकेच्या स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर हात वर करुन झालेल्या मतदानात चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. नारायण चौधरी (महापौर) यांना 48 मतं मिळाली असून भाजपच्या (BJP) स्नेहा पाटील 25 आणि विलास पाटील यांना अवघे 16 मतं मिळाली आहेत. मूळ शेतकरी असलेल्या नारायण चौधरी यांनी बांधकाम व्यवसायिक ते महापौर असा प्रवास करत आज ते भिवंडीचे प्रथम नागरिक बनले आहेत.
भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी 24 वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौरपदाला गवसणी घातली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात त्यांची नावाची चर्चा असून महापालिकांच्या निवडणुकीत अखेर भिवंडी महापालिकेतही महापौरपदाची निवडणूक संपन्न झाली.
कोण आहेत नारायण चौधरी
नारायण चौधरी हे मूळचे भिवंडीतील ताडाली परिसरातील रहिवाशी असून 2002 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सर्वप्रथम 2002 मध्ये ते नगरसेवक बनले, 2002 ते 2007 मध्ये त्यांनी भिवंडी विकास आघाडीमधून नगरसेवक म्हणून कारकीर्द सांभाळली. तर, 2007 ते 2012 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत आपला वेगळा ठसा निर्माण केला. मात्र, 2012 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2012 ते 2017 दरम्यान समाजवादी पक्षातून त्यांची पत्नी अलका नारायण चौधरी यांना नगरसेविका म्हणून निवडून आणले. त्यानंतर, 2017 मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर 2025 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.
दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकतेच झालेल्या भिवंडी महानगरपालिकेतही ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले. यावेळी, त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच त्यांना भाजपाकडून महापौर पदासाठी उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलल्याने त्यांनी सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
व्यवसाय प्रवास
भिवंडीतील ताडाली परिसरात राहणारे नारायण चौधरी शेतकरी असून त्यांनी सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. व्यवसाय करतानाच ते राजकीय क्षेत्रातही कामकाज करत होते. आता भिवंडी शहरात सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख असून नारायण डेव्हलपर्स नावाने त्यांची कंट्रक्शन कंपनी आहे.
नारायण चौधरी हे भाजपचे बंडखोर
महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळेस भाजपमधून फुटून काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार ) यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते दाखल झाले होते.
काँग्रेसने नारायण चौधरी यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करत त्यांनाच मतदान करण्याबाबतचा व्हीप जारी केला होता. त्यामुळे, सेक्युलर फ्रंटचे उमेदवार बनून ते पहिल्यांचा महापौर बनले आहेत.
महापौर पदासाठी तीन उमेदवार रिंगणात
भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते, त्यात नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. हे दोन्ही अर्ज वैध असल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन पैकी एक अर्ज मान्य केला. तर सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यात कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील यांनी आपले अर्ज माघारी घेतले. शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी व सुचिता म्हात्रे यांनी देखील आपले अर्ज मागे घेतले तर काँग्रेसचे तारिक मोमीन व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायण चौधरी, शिंदेसेनेकडून विलास पाटील तर भाजपकडून स्नेहा पाटील हे तीन उमेदवार महापौर पदाच्या निवडणुकीत होते.
महापालिकेतील 90 मतांचं गणित
नारायण चौधरी – ४८
काँग्रेस – 30
राष्ट्रवादी S.P – 12
भाजप – 6
विलास पाटील – 25
कोणार्क विकास आघाडी – 4
शिवसेना – 12
समाजवादी – 6
भिवंडी विकास आघाडी – 3
स्नेहा पाटील – भाजप – 16
एक अपक्ष गैरहजर
भिवंडी महानगरपालिकेत आतापर्यंत विराजमान झालेले महापौर व कार्यकाळ
1) सुरेश काशिनाथ टावरे 2002 – 2005
2) विलास रघुनाथ पाटील 2005 – 2007
3) जावेद गुलाम दळवी. 2007 – 2009
4) यशश्री राजन कडू. 2009 – 2012
5) प्रतिभा विलास पाटील 2012- 2014
6) तुषार यशवंत चौधरी 2014 – 2017
7) जावेद गुलाम दळवी 2017 – 2019
9) प्रतिभा विलास पाटील 2019 – 2022
हेही वाचा
नारायण चौधरीच भिवंडी महापौरपदी विराजमान, भाजपला मोठा धक्का
आणखी वाचा
Comments are closed.