टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार

TET पेपर लीक प्रकरण: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई केली असून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने पावले उचलली असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली आहे.

पुढील टीईटी आणि इतर परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी दादा भुसे यांनी दिली.

याप्रकरणी भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्यात राजू प्रयाग शाम आणि इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी मोठी रक्कम घेऊन पेपरची विक्री करणार होते. सदर गुन्ह्यात या 3 आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि परीक्षार्थींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

TET Exam Fraud : 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार

भिवंडी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत बिहार आणि हरियाणातील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजीव प्रयाग शाम (वय 45, रा. पटना – बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30, रा. पटना – बिहार) आणि धीरज बलराज सिंग (वय 28, रा. पानीपत – हरियाणा) यांचा समावेश आहे. आरोपींकडून उद्याच्या टीईटी परीक्षेचे चार प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले असून, हे पेपर विक्री करण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार होणार असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

TET Exam Paper Leak : आरोपींकडून अनेक कागदपत्रे आणि साहित्य जप्त

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, भारत व नेपाळमधील चलन, रोख रक्कम, बँकेचे चेक, प्रेस आयडी कार्ड तसेच लोक जनशक्ती पक्षाचे कार्ड आणि ओळख पटवणारी इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटमधील कपिल दहिया (हरियाणा) आणि बिजेंदर कुमार (पटना, बिहार) हे अन्य साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Thane Crime Branch SIT : तपासासाठी एसआयटी स्थापन

या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तांच्या गुन्हे शाखेमार्फत (Crime Branch) या प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच ‘SIT’ स्थापन करण्यात आले आहे. डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हे पथक राज्यभरातील आणि देशातील या नेटवर्कचा शोध घेत आहे.

MCOCA Act Investigation : आरोपींवर ‘मकोका’ लावण्याच्या हालचाली

हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी आणि रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘मकोका’ (MCOCA महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याच्या संदर्भात सध्या कायदेशीर तपासणी आणि पडताळणी सुरू आहे. तपासासाठी पोलिसांची विशेष पथके हरियाणा, बिहार आणि दिल्लीला रवाना झाली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.