भेदरलेल्या ग्रामस्थांचा एकच सवाल…फडणवीस जबाबदारी घेणार का? भोर तिसऱ्या दिवशीही बंद; नसरापुरात लेकीबाळी घराबाहेर पडायला घाबरताहेत
भोरमधील नसरापुरात 65 वर्षांच्या भीमराव कांबळे या नराधमाने साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. भोरमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. नसरापुरात लेकीबाळी घराबाहेर पडायलाही घाबरताहेत. त्या चिमुकलीला ज्या यातना झाल्या त्याच्या शंभर पट हाल या नराधमाचे झाले पाहिजेत, तो नराधम सुटणार नाही. त्याला जामीन मिळणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का, असा एकच सवाल भेदरलेल्या नसरापूरकरांनी केला.
आरोपीला चोप देऊन ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नव्हता. तुमची केस नेमकी काय आहे माहीत आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला असता संताप येईल असे उत्तर आरोपीने दिले. ही मारहाणीची किरकोळ केस आहे, असे तो म्हणाला. दरम्यान, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण…
पीडितेच्या वडिलांशी मी दोनवेळा बोललो. त्यांना लेखी पत्र देऊन आश्वस्त केले आहे. नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण असे लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते म्हणून तपासात कोणतीही त्रुटी न ठेवता आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांकडून गृहमंत्र्यांवर टीका होत आहे, असे विचारले असता टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नराधमाला शिवसैनिकांच्या ताब्यात द्या – शिवसेनेची मागणी
नसरापूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. समाजातील ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची वेळ आली आहे. पीडितेला न्याय मिळत नसेल तर प्रशासनाने या नराधमाला शिवसैनिकांच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्याला ठेचून काढू, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. याबाबत शिवसेना उपनेत्या, मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, पुणे जिल्हा संघटिका स्वाती ढमाले यांनी नसरापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
तपासासाठी सहा अधिकाऱ्यांचे पथक
राज्य सरकारकडून घटनेचा तपास करण्यासाठी आज सहा अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. या पथकात दोन महिला अधिकारी तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शुकशुकाट… भयाण शांतता
बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर नसरापूर आणि पंचक्रोशीत भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिला आणि लेकी भेदरल्या आहेत. घराबाहेर जाण्यास त्या घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. गावात भयाण शांतता पसरली आहे. सगळेच हादरले आहेत.
- घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठा बंद आहेत. भोर आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या नसरापुरात मोठी बाजारपेठ आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. भोरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.
त्याला हाल हाल करून मारले पाहिजे
या नराधमाची महिला-लेकीबाळींवर वाईट नजर आहे. दोन गुह्यांत पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला. त्यानंतरही त्याची विकृती कायम आहे. 20 वर्षांपूर्वी त्याला गावाबाहेर हाकलले तरी त्याची दहशत कायम आहे. त्याला आता फाशीच झाली पाहिजे. हाल हाल करून त्याला मारले पाहिजे. त्याला जामीन होता नये. तो उद्या जामिनावर सुटला आणि त्याने पुन्हा असे काही कृत्य केले तर त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, असा संतप्त सवाल नसरापुरातील महिला आणि ग्रामस्थांनी केला.
घटनेला वेगळे वळणदेण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री
ग्रामस्थांचा संताप आणि रोष स्वाभाविक आहे. पण काही लोकांनी या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. नवले पुलाजवळ आंदोलन सुरू होते तेव्हा काही लोक पीडितेच्या वडिलांना तिथून जाऊ देत नव्हे. त्यांना अडवायचा प्रयत्न झाला. हे लोक कोण आहेत, हे लक्षात आलेलं आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलिसांची दडपशाही, नवले पुलावर आंदोलकांवर बेछूट लाठ्या चालवल्या
पीडितेचा मृतदेह घेऊन नवले पुलावर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले. चार तास पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी बेछूट लाठीमार करत नवले पुलावरून आंदोलकांना पांगवले. काही आंदोलकांना बखोटीला पकडून ओढत नेण्यात आले. त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीमार झालाच नाही, असे सांगितले. पीडितेच्या आई-वडिलांना समजावून तिथून नेण्यात आले. त्यांच्यावर कोणतीही सक्ती करण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, रात्री उशिरा चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.